Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, डॉ आंबेडकरांना पराभूत करण्यात भाजपा-आरएसएसही

राज्यसभेत भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानकारक उल्लेख केला. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते अमित शाह यांना इशारा देत म्हणाले की, बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला अन्यथा याद राखा असा इशाराही यावेळी दिला.

या मोर्चात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज जो लढा आपण सुरू केला आहे, तो आपण जेव्हा वस्ती-वस्तीत, घरा-घरात जाऊ तेव्हा एक जागरूकता आपण निर्माण करायची आहे. या पुढे चळवळ असो की कोणीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावे लागेल, अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अमित शाहला वाचवायला नरेंद्र मोदी धावून आले. आपल्याला माहीत असेल की, या मुंबईत एक रंगा बिल्ला नावाची जोडी होती आणि आताचे हे रंगा बिल्ला एकमेकांना वाचवत आहेत अशी टीकाही यावेळी केली.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, मी नरेंद्र मोदी यांना सांगतो की, काँग्रेसला जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत तेवढ्या द्या. आम्हाला काय फरक पडत नाही. पण, त्याच्यामुळे तुमचं चारित्र्य उज्ज्वल होईल का ? तर अजिबात नाही. तुमचं चारित्र्य आधीच डागाळलेलं असल्याची टीका करत काँग्रेसने डॉ बाबासाहेबांचा पराभव केला असे भाजपा सांगते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी तुम्हाला विचारतो की, या मध्य मुंबई मधील १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत आरएसएस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ? हे सांगा. या दोघांनी मिळून मध्य मुंबईमध्ये डॉ बाबासाहेबांना निवडणुकीत हरवले आहे, हा इतिहास असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, काँग्रेसने बाबासाहेबांना विरोध केला होता का? तर हो केला आहे. पण, तुमच्या आरएसएसने केलाय की नाही? हे सांगा असा सवाल उपस्थित करत ज्यावेळी संसदेत महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा झाली. त्यावेळी नरेंद्र मोदी तुम्ही ज्या आरएसएसचे स्वयंसेवक आहात, त्यातील महिला स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर मोर्चा काढला होता की नाही, ते सांगा असे आव्हानही यावेळी दिले.

या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, मुंबई शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह हजारो संविधान प्रेमी आणि फुले – शाहू – आंबेडकरवादी जनता उपस्थित होती.

Exit mobile version