Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महायुती सरकारचा निर्णय आरक्षित समूह आरक्षणापासून वंचित

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणात क्रिमी लेयर लागू करण्याच्या दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षित असलेला समूह आरक्षणाच्या लाभापासून कायमचा वंचित राहणार असल्याचा आरोप केला.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 𝑻𝒉𝒆 𝒄𝒂𝒕 𝒊𝒔 𝒐𝒖𝒕 𝒐𝒇 𝒕𝒉𝒆 𝒃𝒂𝒈 या इंग्रजी म्हणी प्रमाणे पिशवीत दडवून ठेवलेलं मांजर आता बाहेर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणात क्रिमी लेयर लागू करण्याच्या दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज निवृत्त न्यायमूर्ती मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाचेही या निर्णयाला पाठबळ आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांची ही मिलीभगत असल्याचा आरोपही केला.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षित असलेला समूह आरक्षणाच्या लाभापासून कायमचा वंचित राहणार आहे. राज्यातलं राजकारण हे ‘मराठा खानावळ’ झालं आहे. उद्धव ठाकरे फक्त यात उपरे आहेत बाकी मराठा नेते ठरवतील तेवढंच इतरांच्या वाट्याला येणार अशी परिस्थिती दिसत आहे. राज्यातला आरक्षणवादी मतदार या मराठा खानावळीला निवडणुकीत नक्कीच धडा शिकवेल. असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version