Marathi e-Batmya

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै २०२६ पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत एचएसआरपी बसवून घ्यावी.

वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी आगाऊ वेळ निश्चित करावी. संबंधित वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, ज्या वाहनधारकांनी मुदतीत एचएसआरपी बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क आकारण्यात येईल.

वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच एचएसआरपी साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे.

Exit mobile version