Marathi e-Batmya

प्रियांका गांधी-वड्रा यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ; पण राहुल गांधी मुळे झाले स्तब्ध

वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांचा विजय झाला. मात्र कालपासून सुरु झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी प्रियांका गांधी आणि इतर काही खासदार लोकसभेत जात होते. नेमक्या त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे ही प्रियांका गांधी यांच्यासोबत होते. त्यावेळी अचानकपणे राहुल गांधी हे पुढे येत प्रियांका गांधी यांना लोकसभेच्या पायऱ्यांवर थांबवले. त्यामुळे प्रियांका गांधी-वड्रा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले सर्व खासदार स्तब्ध होत काही काळ गांगरल्याचे दिसून आले.

झाले असे की, वायनाड येथील लोकसभा पोटनिवडणूकीत विजय मिळविल्यानंतर हिवाळी अधिवेशात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी पहिल्यांदाच संसदेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे बंधू आणि लोकसेभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ही प्रियांका गांधी यांच्यासोबत येत होते. त्यावेळी ते लोकसभेत प्रवेश करण्यासाठी सदनाच्या पायऱ्यावर पोहोचताच अचानकपणे राहुल गांधी हे सर्वांच्या पुढे येत स्टॉप, स्टॉप म्हणत प्रियांका गांधी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सर्व खासदारांना थांबण्याची सूचना केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कृत्यामुळे प्रियांका गांधी-वड्रा यांच्यासह सर्व जण काही काळ भांबावले आणि गांगरून पायऱ्यावरच थांबले. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल काढून प्रियांका गांधी-वड्रा यांच्यासह सर्व खासदारांचा एकत्रित असलेला फोटो काढण्यास सुरुवात केली. राहुल गांधी यांच्या या कृत्यानंतर प्रियांका गांधी-वड्रा यांच्यासह सर्वांनीच नंतर सुस्कारा सोडला. प्रियांका गांधी-वड्रा यांनी त्यानंतर राहुल गांधी यांनी काढलेला फोटो सर्वांना दाखविला.

त्यानंतर प्रियांका गांधी-वड्रा यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र शपथ घेताना हातात राज्यघटनेची पुस्तिका हातात घेऊन खासदारकीची शपथ घेतली.

 

Exit mobile version