Marathi e-Batmya

आमदार रईस शेख यांची मागणी, भायखळ्यातील ‘उर्दू शिक्षण केंद्र’ प्रकरणी बैठक बोलवा

भायखळा मधील‘उर्दू शिक्षण केंद्र’चा निर्णय संबंधितांची बैठक घेवून करण्यात येईल, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले असतानाही महापालिका आणि पालकमंत्री यांनी ‘उर्दू शिक्षण केंद्रचा भूखंड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देवून विधानसभा अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांचा अवमान केला असून या प्रकरणी संबंधित लोकप्रतनिधींची बैठक बोलावावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

यासदंर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, वर्ष २०२३ मध्ये विधानसभेमध्ये याप्रकरणी लक्षवेधी उपस्थित झाली होती. तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वैकर यांनी याप्रकरणी संबंधितांची दालताना बैठक बोलवण्यात येईल आणि निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश दिले होते. मात्र त्याची पूर्तता होण्यापूर्वी पालकमंत्री मलंगप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर दबाव आणून ‘उर्दू शिक्षण केंद्रचा प्रस्ताव रद्द करण्यास भाग पाडले.

पुढे बोलताना आमदार रईस शेख यांनी सांगितले की, ‘उर्दू शिक्षण केंद्रच्या इमारतीचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता हा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून तेथे औद्योगीक प्रशिक्षण संस्था करण्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. ही प्रथा चुकीची असून लोकप्रतिनिधींचा अवमान झालेला आहे, असा आरोपही यावेळी केला.

आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, भायखळ्यातील ‘उर्दू शिक्षण केंद्र प्रस्ताव स्थानिक लोकप्रतिनिधींना होता. त्याला पालिका सभागृहाने वर्ष २०२२ मध्ये मंजुरी दिली होती. म्हणून प्रकरणी तातडीची संबंधितांची बैठक बोलवण्यात यावी आणि चर्चा करुन यावर निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा, सार्वभौम असलेल्या विधानसभा सभागृहासाठी चुकीचा पायंडा पडेल असा इशाराही यावेळी दिला.

शेवटी बोलताना रईस शेख म्हणाले की, सदर प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि संबंधितांची बैठक बोलवावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. तसेच त्यासंदर्भातले पत्र अध्यक्ष नार्वेकर यांना ते उद्या, सोमवारी देणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version