Marathi e-Batmya

राज ठाकरे यांचा सरकारला इशारा, हिंदी सक्ती हा महाराष्ट्रद्रोहच

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत त्रिसुत्री भाषा धोरणानुसार हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात करण्यात आली. मात्र त्यास सर्वच विरोधी पक्षियांनी विरोध केल्यानंतर आता राज्य सरकारने हिंदी भाषेला भारतीय भाषेचा पर्याय ठेवला आहे. मात्र त्यास २० विद्यार्थ्यांची अट कायम ठेवली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्याने शासन निर्णय जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट राज्य सरकारला इशारा देत हिंदी सक्ती हा महाराष्ट्र द्रोह समजू असा इशारा देत हिंदी भाषा कशी शिकवता असा सज्जड दमही दिला आहे.

राज् ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, इयत्ता पहिलीपासून तीन- तीन भाषा शिकविण्यास आमचा विरोध आहे. हिंदी भाषा आमच्यावर का लादली जात आहे? हिंदी उत्तरेकडील काही राज्यांची भाषा आहे, ती राष्ट्रभाषा नाही. हिंदीची सक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरात राज्यात का नाही? जर तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात राज्यांत हिंदी भाषा शिकवली जात नाही, तेथे सक्ती केली जात नाही तर महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कशासाठी? आयएएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात हिंदी बोलणे सोपे जावे यासाठी हिंदीची सक्ती केली जात आहे का? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. राज्य सरकारने तात्काळ हिंदीची सक्ती मागे घ्यावी अन्यथा महाराष्टात हिंदी भाषा कशी शिकवली जाते ते बघतोच आणि हिंदी सक्ती ही महाराष्ट्र द्रोह समजू असा असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्रात पहिलीपासून सर्व शाळांमधून हिंदी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी रात्री मागे घेतला. मात्र, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवला जाईल असे सांगत राज्यात हिंदी भाषेची एकप्रकारे सक्ती कायम आहे. हा शासन आदेश समोर येताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, आज मी केवळ शैक्षणिक विषयावर बोलणार आहे, त्याशिवाय इतर कोणत्याही बाबींवर बोलणार नाही. हिंदी सक्तीची करणार असा निर्णय शासनाने घेतला. यापूर्वी मी दोन पत्रके काढली होती. आता माझे तिसरे पत्रक आज जाणार आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहले आहे. हे पत्र ५ दिवसांपूर्वी मी लिहले आहे. यासंदर्भात माझे मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले. हा निर्णय आम्ही मागे घेत आहोत असेही त्यांनी मला सांगितले आणि पुन्हा हिंदी सक्तीचा शासन निर्णय काढला आहे. राज्य सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच निर्णय येण्याआधीच हिंदी भाषेची पुस्तके छापत आहे. सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडू. पहिलीपासून तीन -तीन भाषा शिकविण्याची गरज नसल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पाचवी-सहावीपासून हिंदी भाषा मुले शिकतातच तसेच मुले मोठी झाल्यावर त्यांना हवी ती भाषा अगदी जर्मन, फ्रेंच, जपानी भाषाही शिकतात. व्यावसायिक गरजेनुसार लोक भाषा शिकतात. राज्य सरकार सांगते केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करत आहोत. पण हा विषय राज्याच्या कक्षेतील आहे, केंद्राच्या नाही. तसे असते तर हिंदी भाषा देशभर शिकवली असती. दक्षिणेकडील राज्यात, अगदी गुजरातमध्ये हिंदी भाषा शिकवली जात नाही. त्रिभाषा सूत्र असेल तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदी आणि इंग्रजी याशिवाय तिसरी भाषा कोणती शिकवले जाते याचे उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावे. जर देशात राज्येच जर भाषावार प्रांतरचनेनुसार तयार केली असतील तर हिंदी भाषा आमच्यावर का लादता. राज्याची संस्कृती पाहून निर्णय घ्यावा असे केंद्राने म्हटलेले आहे. आमचा विरोध हिंदी भाषेला नाही पण ती आमच्यावर लादली गेली तर आमची भाषा, संस्कृती, साहित्य याचा -हास होऊन मराठीचे अस्तित्व राहणार नाही. या गोष्टीत राजकारण आणू नये, हा काही राजकारणाचा विषय नाही. मराठी अस्तित्व संपवण्याचा हा घाट आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे, असे आवाहनही केले. राज्यातील जनतेने, शिक्षक, साहित्यिक, पत्रकार आदी घटकांनी या लढ्यात उतरावे व सरकारला विरोध करावा असे आवाहनही यावेळी केले.

हिंदीला विरोध करा, राज ठाकरेंनी लिहले मुख्याध्यापकांना पत्र 

राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला राज्यातील जनतेसह समाजातील विविध घटकांनी विरोध करावा असे आवाहन करत राज्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना पत्र लिहले आहे. मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यात मुलांचे नुकसान आहेच पण मराठी भाषेचे नुकसान आहे. एवढे सांगून देखील सरकार ऐकणार नसेल आणि आमच्यावर हिंदी भाषा लादणार असेल तर संघर्ष अटळ आहे. सरकार जे सांगेल त्याला तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत.  जे राजकारण राजकारण चालू हे समजून घ्या. काहींना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा माथी मारली जात आहे. तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील, असेही राज ठाकरे यांनी आपल्या भावना मुख्याध्यापकांच्या पत्रात मांडल्या.

Exit mobile version