राज्य सरकारने केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनांकडून सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे अवघ्या मराठीजनांच्या विरोधामुळे अखेर राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या मुद्यावरून माघार घेतली. तसेच हिंदी सक्तीचा निर्णय आणि त्रिसुत्री भाषेचा निर्णयही मागे घेतला. त्या निमित्त आयोजित विजयी मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्याला पहिल्यांदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संबोधित केले.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पश्चिम उपनगरात नुकत्याच घडलेल्या घटनेवर बोलताना म्हणाले की, तेथे घडलेली घटना ही काही मराठी विरूद्ध गुजराती अशी काही नव्हती. एक बाचाबाचीची घटना घडली. त्यात समोरचा व्यक्ती हा गुजराती निघाला तर एक मराठी निघाला. समोरच्याचा कपाळावर काय गुजराती म्हणून लिहिले होते का असा सवाल करत अजून तरी आम्ही काहीच केलं नाही असे सांगताच कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा उसळला.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मराठी भाषा आलीच पाहिजे, विनाकारण मारामारी करायची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक समोरच्याची असली पाहिजे असा इशारा देत उगाच उठसूठ कुणालाच मारू नका अशी सूचनाही यावेळी केली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझं एक सर्वांना आवाहन आहे, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा कोणी व्हिडीओ-बिडीओ रेकॉर्ड करू नका. कारण मारणारा माणूस कधी सांगतो का की मी मारलं म्हणून मार खाणारा माणूसच सांगतो ना की मला मारलं मला मारलं असे आवाहनही यावेळी करत जे काही काही आपल्यातलं आपल्यालाच कळलं पाहिजे असे सांगायलाही विसरले नाही.
भाषेवरून गुंडगिरीच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तुमची सत्ता असेल, बहुमत असेल ते तिकडे विधानभवनात आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे असा गर्भित इशारा भाजपा आणि महायुती सरकारला देत मात्र मला कळलंच नाही की हा हिंदी सक्तीचा विषय आला कोठून कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना विचारायचं नाही, फक्त आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, मग आम्ही लादणार असं कसं चालेल. तुमच्याकडे सत्ता असेल पण ती विधानभवनात आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे अशी आठवणही भाजपाला करून दिली.
तसेच राज ठाकरे यांनी पुढे बोलताना सांगितले की, जी हिंदी भाषिक राज्य आहेत, ती आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, आणि जी बिगर हिंदी भाषिक आहेत, ती आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. आणि ती हिंदी भाषा आपण शिकायची असेही यावेळी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ह्यांना हिंदी भाषिक राज्ये सांभाळता आली नाही, तिथला राज्य कारभार अद्याप नीट करता येत नाही. मग हिंदी भाषा कशासाठी शिकायची शिकायची, काय हिंदी चित्रपटात काम मिळावी म्हणून. ती भाषा शिकायची. त्यांची माणसं जगायला इक़डे येणार. कोणासाठी आणि कशासाठी काय करायचं नेमकं. २०० वर्षे जुनी भाषा आहे ती. त्यांनी फक्त चाचपडून बघितलं. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत असा इशारा देत तरीही अंगावर येतायत. मग हे प्रकरण अंगाशी येताच हे सगळं प्रकरण वेगळ्या वळणाला न्यायच असे यांच धोरण आहे अशी टीकाही यावेळी केली.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आणि दक्षिणेतील अनेक नेते कोणत्या शाळेत शिकले याची एक यादीच वाचून दाखविली. तसेच या नेत्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषेबद्दलचा अभिमान कमी झाला का असा सवाल करत सध्याच्या अनेक नेत्यांच्या मुलांच्या शाळांची यादीही राज ठाकरे यांनी वाचून दाखविली.
राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना, त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि चुलते बाळासाहेब ठाकरे हे दोघेही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्याचे सांगत मात्र त्याचा मराठी भाषेबद्दलच्या अभिमानाबद्दल कोणी शंका घेईल असे सांगत राज्यात जेव्हाही मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित होतं तेव्हा एक प्रश्न उपस्थित केला जातो तो म्हणजे मग यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या भाषेत कशी शिकली. पण मुळातच शिक्षण भाषेच्या अभिमानाचा मुद्दाच वेगळा असल्याचे सांगत, भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या बद्दल बोलताना म्हणाले की, लालकृष्ण आडवाणी याचं शिक्षण ख्रिश्चन मिशनरी शाळेत झालं. पण त्यांच्या हिंदूत्वाबद्दल कोणी शंका घेईल का असा सवाल करत हे असले प्रश्न फक्त महाराष्ट्रातच विचारले जातात असे सांगितले.
यावेळी राज ठाकरे यांनी मराठी नागरिकांना इशारा देताना म्हणाले की, आज मराठी म्हणून एकत्र आलात, ही एकजूट अशीच ठेवा. अन्यथा आपल्यासमोर पुढे काय काय वाढून ठेवलंय ते आताच सांगता येणार नाही. आपल्यात मध्ये भांडण लावण्यासाठी मराठी हिंदी असे वाद लावण्याचे प्रयत्न केलेत. आता तुम्हा सर्वांना जाती जातीत विभागाण्याचे प्रयत्न सुरु होतील. पण त्याला बळी पडू नका लोकसभा निवडणूकीच्यावेळी काय झालं ते लक्षात आहे ना अशी सूचक इशाराही यावेळी दिला.
तसेच राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पुढं काय होईल ते होईल पण स्व. बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न साकार करण्यासाठी ही एकजूट कायम ठेवा असे आवाहनही यावेळी शेवटी केले.
