राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले, तरी त्यांच्यातील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र शिर्डी मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची साथ सुटली, अशी खंत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे व्यक्त केली.
तसेच शिर्डीत पराभव झाला नसता तर कदाचित आपण आजही शरद पवारांसोबतच राहिलो असतो, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात रामदास आठवले आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले.
शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला रविवारी कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे रामदास आठवले आवर्जून उपस्थित राहिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर शरद पवार, एकनाथ खडसे आणि ना. रामदास आठवले एकाच व्यासपीठावर आले. रामदास आठवले यांनी आपल्या भाषणातून जुन्या राजकीय आठवणींना उजाळा दिला.
शरद पवारांसोबतचे संबंध आजही कायम
रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत आपण अनेक वर्षे काम केले आहे. राजकारणात मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध तोडण्याची गरज नाही. राजकारणात कोणतेही वैर कायम ठेवू नये. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून देश चालवतात, असेही नमूद केले. सध्या आपण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत असल्याने पुन्हा शरद पवारांसोबत जाणे शक्य नाही. एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, तर आपण सध्या वेगळ्या राजकीय आघाडीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना रामदास आठवले यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत टिप्पणी केली. आपण ज्यांच्या बाजूला जातो, त्यांना नंतर सत्ता मिळते आणि आपल्यालाही मंत्रीपद मिळते. मात्र, आपण केवळ मंत्रीपदासाठी कुठेही जात नसल्याचेही स्पष्ट केले. रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी हास्याची लकेर उमटली. विशेष म्हणजे, शरद पवार यांनीही त्यांच्या भाषणाला खळखळून हसत दाद दिली.
पँथरच्या चळवळीनंतर पवारांकडून मंत्रीपद
रामदास आठवले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणीही सांगितल्या. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना पँथरच्या चळवळीनंतर शरद पवार यांनी आपल्याला मंत्रीपदाची पहिल्यांदा संधी दिली होती. त्यावेळी समाजकल्याणसह विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या आपल्याकडे होत्या, असे रामदास आठवले यांनी सांगितले. पवारांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपल्याला राजकारणात महत्त्वाची संधी मिळाली, याची आठवण यावेळी करून दिली.
आपल्या राजकीय वाटचालीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पराभव हा महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे रामदास आठवले सांगत शिर्डीत आपण पराभूत झालो आणि त्यानंतर राजकीयदृष्ट्या वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला. शिर्डीत पराभव झाला नसता तर कदाचित शरद पवारांसोबतच राहिलो असतो, असे स्पष्ट करत पवारांसोबत राहिलो असतो तर आपले नुकसान झाले असते, अशी मिश्किल पुस्तीही जोडली. कारण त्यानंतर आपल्याला तब्बल १३ वर्षे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
शेवटी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार यांनी आपल्याला राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आपण ती संधी स्वीकारण्यास नकार दिला. राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या असल्या तरी पवार आणि आपले संबंध आजही चांगले आहेत. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरीही सादर केली.
