Marathi e-Batmya

सतेज बंटी पाटील यांचा इशारा, शक्तीपीठ महामार्ग विरोधात १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा

शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना सतेज बंटी पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत पुढे बोलताना म्हणाले की,  राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापुर पूर्ता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकार मध्ये राहायचं, आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारानी वेगवेगळी स्टेटमेंट करायचं हे सरकारच षडयंत्र असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना सतेज बंटी पाटील म्हणाले की, गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या असताना सुद्धा शक्तीपीठ का लादला जातं आहे.. ८६ हजार कोटीचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम पाहता एका किलो मीटरला, ११० कोटींचा खर्च येणार आहे…शक्तिपीठ मध्ये कोण फित्तुर होऊ नये यासाठी काळजी घेऊया..न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करुया.. असं सांगत येणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व जण ताकतीने प्रश्न मांडू.. आपापल्या जिल्हयातील आमदारांचे शक्तीविरोधाबाबत पत्र घ्या. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असून अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात १२ मार्चला भव्य मोर्चा काढण्यात येणार असून शेतकऱ्यांची ताकत सरकारला दाखवून देऊ असा इशाराही यावेळी दिला.

ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत. आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत राज्य, महायुती सरकारला चालवायचं होतं. मात्र शेतकऱ्यावर अन्याय सुरू आहे. हे सरकार गोरगरीब लोकांना मदत करणारे नाही. कधीही पोट न भरलेली, माणस मंत्री मंडळात आहेत. त्यांना सर्व सामान्यांशी देणंघेणं नाही. अशी टिकाही त्यांनी केली. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी, सामाजिक न्यायासाठी कोल्हापूर भूमी ओळखले जाते..शक्तीपीठालां होणारा विरोध पाहून सत्ताधीश हादरले असल्याचेही यावेळी सांगितले.

राज्यातील दहा जिल्हातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. एकाही आमदारा बरोबर बैठक झाली नसताना बैठक झाल्याचे मुख्यमंत्री खोटे सांगत असून शेतकऱ्याच्या शेतजमिनी काढून घेण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप केला. भाजपाचे कोण कंत्राटदार आहेत, त्यांच्या नावा निशी त्यांचा भांडाफोड करण्याचा इशाराही गिरीश फोंडे यांनी दिला. लातूर जिल्हयातील गजेंद्र यळकर यांनी, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात आहेत. नदीजोड सारखे प्रकल्प द्या बागायती जमिनीवर आरक्षण टाकणारे प्रकल्प नको अशी मागणी केली.

सोलापूर येथील शेतकरी विजयकुमार पाटील यांनी, कोल्हापूर जिल्हा सोडुन इतर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याच भासवण्यात येत आहे. मात्र सोलापूर जिल्हातूनही आमचा शक्ती पीठाला विरोध आहे. त्यामुळं सरकारनं दिशाभूल करू नये, आमच्या जमिनी आमदारांच्या बापाच्या आहेत काय असा परखड सवालही केला.

या बैठकीला, आमदार जयंत आसगावकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम,शेतकरी संघाचे संचालक सर्जेराव देसाई, बीडचे शेतकरी लालासाहेब शिंदे, हिंगोलीचे बापूराव ढेरे ,  नांदेडचे सुभाष मारेलवर, विक्रांत पाटील किणीकर, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, उत्तम सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version