विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना उबाठामध्ये पदांसाठी अप्रत्यक्ष भ्रष्टाचार होत असल्याचे टीका केली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर खोचक भाषेत टीका केली. तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी बोलावे असे आव्हानही केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलाच्या व्यासपीठाचा उपयोग राजकारणासाठी केला. तसेच त्यांनी केलेले वक्तव्य हे मुर्खपणाचे होते अशी टीका करत असे वक्तव्य करायचे होते तर साहित्य संमेलनाला यायचे नव्हते अशी टीपण्णीही यावेळी केली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांच्या राजकिय जीवनाची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षापासून झाली. त्यानंतर त्या काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला, त्यानंतर त्या पुन्हा समाजवादी पक्षात आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात गेल्या. शिवसेना पक्षानेच त्यांना आमदार म्हणून संधी दिली. आणि आता त्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे या मागील ठराविक काळात इतक्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करायला नको होते असेही यावेळी सांगितले.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांवर शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, संजय राऊत यांचे म्हणणे बरोबर आहे. तसेच त्यांच्याकडून राजकिय भूमिका सकाळपासून सुरु होते ते रात्री पर्यंत राजकिय भूमिका मांडत असतात.
एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली, त्यावर शरद पवार म्हणाले की, माझ्या हस्ते मी कोणाला पुरस्कार द्यायचा यासंदर्भात मी काळजी घेईन, पण पुरस्कार कोणाला प्रदान करायचा आणि कोणाला नाही यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांना फटकारलेही.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीत मराठी साहित्य संमेलन दुसऱ्यांदा पार पडले. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत आणि उद्घाटनाने झाले होते. त्यानंतर यावेळी ते पार पडले. या साहित्य संमेलनाला अनेक मराठी भाषिक अधिकारी, उत्तर भारतात राहणारे अनेक मराठी भाषिकही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे हे साहित्य संमेलन यशस्वी ठरले असे म्हणता येईल असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ तारा भवाळकर यांचे जे भाषण होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे होते. तसेच त्यांच्या पार्टी लाईनवर आघात करणारे होते असेही यावेळी सांगत उद्घाटनावेळी केलेले त्यांच्या पहिल्या भाषणाचा भाग उत्तम होता, त्यानंतर दुसऱ्या भागातील भाषण ऐकले तेही चांगले होते असेही यावेळी सांगितले.
