Marathi e-Batmya

शरद पवार यांचा खोचक टोला,… शहाण्यांनी आता याची नोंद घ्यावी

अनेकांना अनेक वर्ष संधी देऊनसुद्धा काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी सत्ता पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे स्वच्छ दिसतंय. त्यावर उत्तर शोधावं लागेल. ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम असल्याची भूमिका असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुखशरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अजित पवार गटातील अनेकजण शरद पवार गटात प्रवेश करत असल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या कडे जे लोक आले त्यांना आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या भागातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांना मदत करण्याच्या भावनेने जर कोणी येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असेही यावेळी सांगितले.

विशाळगड दंगलप्रकरणी शरद पवार म्हणाले की, विशाळगडाच्या खाली जो मुस्लिम समाज राहत होता, त्यांच्यावर कारण नसताना हल्ले झाले. हल्ले करणाऱ्यांमध्ये कोल्हापूरचं कोण होतं असं दिसत नाही, बाहेरच्या लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसतोय. हायकोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे तिथे शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले की, याचे दोन भाग आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणूकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेते. या आयोगाने काल निर्णय घेतला. यापुढं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील. अन्य पिपाणी वगैरे चिन्हावर बंदी घातली आहे, हा अतिशय उत्तम निर्णय झालाय. मात्र हा फक्त राज्यापुरता लागू आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगानेही हाच निर्णय लागू करायला हवं, असे मतही यावेळी व्यक्त केले.

पूजा खेडकर प्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी जी माहिती घेतली, ती देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे. त्या चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले, ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्याने दखल घेईल, योग्य ती कारवाई करतील, अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आता मला कल्पना नाही, ते कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते. त्यावर भाजपा आणि आरएसएसचे लोक वक्तव्य करायला लागले. शहाण्या माणसांनी याची नोंद घ्यावी, असा उपरोधिक टोलाही यावेळी पंतप्रधान मोदी यांना लगावला.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता बघा पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिलेत. याचा अर्थ जनतेचा कल बदललेला आहे. आता जनतेने आमच्याबाबत अपेक्षा ठेवल्या आहेत. दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा, मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. ३५ वर्षे आमदार, त्यापैकी २५ वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना २५ वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अतुल बेनके सध्या कोणत्या पक्षात आहेत मला माहिती नाही. पण, आम्हा दोघांत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या उमेदवाराचं काम केलं ते सगळे आमचेच आहेत असं माझं मत आहे. अतुल बेनके यांचे वडील वल्लभ शेठ बेनके माझे चांगले मित्र होते. अतुल हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यामुळे या भेटीत राजकारण आणू नका असे आवाहनही यावेळी केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, पुण्यात किती जागा मिळू शकतात, याबाबत आम्ही आताच काही बोलणार नाही. पण आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे. त्यासाठी तीनही पक्ष एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. त्यामुळे आम्हाला इतक्याच जागा द्या याच जागा द्या असे आम्ही करणार नाही. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आम्ही तीनही पक्ष मिळून लढणार आहोत. लोकांच्या समोर जाणार आहोत आणि या राज्यात स्थिर सरकार आणणार आहोत. हे आमचं मुख्य उद्धिष्ट असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभेत २०१९ मध्ये राज्यात काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला ४८ पैकी ३१ जागा दिल्या. याचा अर्थ महाविकास आघाडीला जनतेने मोठी साथ दिली. लोकांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा केल्या त्या पाहता आता राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकणे गरजेचे असल्याचे मतही स्पष्ट केले.

Exit mobile version