Marathi e-Batmya

चंद्रपूरात भाजपाच्या महापौराला शिवसेना उबाठाचा पाठिंबा

राज्यात आणि देशात भाजपाच्या घंटा बडवणारे हिंदूत्ववादावरून आणि राजकिय हेवेदाव्यातून शिवसेना उबाठा आणि भाजपाची २५ वर्षाची युती तुटली. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना उबाठा या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला. मात्र चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पक्षातच सत्तेपूर्वीच दोन गटात संघर्ष सुरु झाला. त्यामुळे भाजपाने या संधीचा फायदा घेत थेट शिवसेना उबाठाशी आणि शिवसेना उबाठानेही अगदी शेवटच्या क्षणी भाजपाशी युती केली. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदी भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तसेच चंद्रपूरचे महापौर पद सव्वा सव्वा वर्षे विभागून घेण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर पदी भाजपाच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताने तर उपमहापौर पदी शिवसेना उबाठाचे प्रशांत दानव य़ांची ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले.

चंद्रपूर महापालिकेत भाजपाचे अवघे २४ नगरसेवक आहेत मात्र भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी आपल्या राजकिय वजन वापरत २४  नगरसेवकांची संख्या ३२ वर नेली. विशेष भाजपामध्ये निवडणूक पूर्व काळात किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या ज्या प्रमाणे राजकिय भांडणे लागली होती. अगदी त्याच पद्धतीने निवडणूकीनंतर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात वादावादी सुरु झाली. ही वादावादी दिल्लीपर्यंत पोहोचली.  अखेर या भांडणाचा फायदा भाजपाने उचलत चंद्रपूर महापालिकेवर भाजपा-सेनेचा भगवा फडकाविला.

महापालिका निवडणूकांचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहिर झाले. तेव्हापासून महापौर व उपमहापौर कोण ही चर्चा सर्वत्र सुरु होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत निवडूण आलेले काँग्रेसचे २७ नगरसेवक असतानाही काँग्रेस पक्षावर पराभवाची नामुष्की ओढवली.

महापालिकेचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी विशेष सभा घेण्यात आली. या महापौर पदासाठी १० नामनिर्देश पत्रे दाखल झाली. मात्र अन्य काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे काँग्रेसच्या वैशाली महाडोळे आणि भाजपाच्या संगीता खांडेकर यांच्या थेट लढत झाली. या लढतीत काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ तर भाजपाच्या संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाल्याने भाजपाच्या संगीता खांडेकर यांची महापौर पदी निवड करण्यात आली.

तर उपमहापौर पदासाठी अपक्ष उमेदवार प्रशांत दानव आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रदीप देशमुख यांच्यात थेट लढत झाली. या निवडूकीत दोघांनाही ३२ अशी समसमान मते मिळाली. त्यावेळी ईश्वरीय चिठ्ठीच्या माध्यमातून प्रशांत दानव यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली. एमआय़एमच्या एका सदस्याने उपमहापौर पदासाठी मतदान केले. तर महापौर पदासाठी तटस्थ भूमिका घेतली.

Exit mobile version