जयंत पाटील आणि आमची भेट तिथे झाली नाही. आम्ही आलो जयंत पाटील आले आणि अर्थ खात्याची चर्चा झाली हा तर्क कुठला लावलाय मला माहित नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना केला.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, जयंत पाटील यांचा काय संबंध… त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट का घेतली हे त्यांनी जाहीर केले आहे. तेही एका पक्षाचे नेते आहेत शिवाय एकेकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. अनुभवी नेते आहेत. एक स्वयंभू नेते आहेत. माझी भेट का झाली हे आधीच स्पष्ट केले. प्रफुल पटेल यांना मध्यरात्री बाहेर जायचे असल्याने तेही तिथे आले त्यांचे विषय त्यांनी मांडले हा योगायोग होता अशी स्पष्टोक्ती सुनिल तटकरे यांनी दिली.
सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, मी खासदारही आहे, त्यामुळे मुख्यमंत्री भेट म्हणजे ती राजकीय भेट असेल असा काही भाग नसतो. माझ्या मतदारसंघातील विविध विकासकामे आहेत. माझे दिल्ली स्तरावरील प्रस्ताव राज्यस्तरावर पाठवायचे आहेत. त्यामुळे अशा वेळी सर्वच गोष्टी ज्ञात असणं अभिप्रेतच नाही. ज्यावेळी राजकीय किंवा पक्षाशी निगडीत विषय येईल त्यावेळी परस्परांशी चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. राजकीय चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करायची असेल तर वहिनींशी आम्ही बोलत असतो. पण लोकसभा मतदारसंघातील विषय असतील त्यावेळी विचारुन जाणं अभिप्रेत नाही. मी दिर्घकाळ राजकारणात आहे. मलाही राजशिष्टाचार माहिती आहे. पवारसाहेबांनी आम्हा सर्वांना राजशिष्टाचार शिकवलेला आहे. त्यामुळे संवाद परस्परांशी असावा हे माहित आहे असेही सांगितले.
सुनिल तटकरे म्हणाले की, वहिनी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. आमचा संवाद उत्तम आहे. ज्या पध्दतीने दादांशी संवाद होता त्याच पध्दतीचा संवाद वहिनींशी आहे. त्यामुळे गैरसमज असण्याचा प्रश्नच येत नाही किंवा उद्भवत नाही. वहिनींनी आम्हाला बोलावून घेतले हा भाग आमच्या पक्षामध्ये नाही. आम्ही नेहमीतपणे भेटत असतो असेही स्पष्ट केले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, स्वर्गीय अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या आणि अंतिम टप्प्यापर्यंत पोचल्याही होत्या. त्या सर्व चर्चा मला माहित होत्या पण दुर्दैवाने दादांचे निधन झाल्यावर विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. काही दिवसांपूर्वी पवारसाहेबांच्या पक्षाची राज्यपातळीवरील बैठक झाली त्यावेळी कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलिनीकरण विषयाला पूर्णविराम आहे ही भूमिका मांडली आहे त्यामुळे नव्याने चर्चा कुठे सुरू झालेली नाही. सुरु झालीच तर मग तो विषय येतो. पण आज तरी कुठे चर्चा सुरू नाही. ज्या भूमिकेची अजून कुठेही सुरुवातच झाली नाही त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचे कारणच नाही. पूर्णविराम कुणी दिलाय तर त्यांनी आम्ही तर सुरुवातच केली नव्हती दादा असताना दादाच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष होते दादांनी जो निर्णय घेतला असता तर त्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन आम्ही सर्वांनीच मोकळेपणाने… एकमताने केले असते. ज्यावेळी चर्चा येईल त्यावेळी माझं मत मांडेन मात्र जी चर्चाच नाही त्याबद्दल आज मत मांडायची घाई कशाला करु. माझा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेता कधी घाई करावी… कधी मत मांडावे… तेवढं नक्की समजतं…ज्यावेळी चर्चेचा सुर निघेल त्यावेळी माझं मत काय आणि माझं मत काय आहे हे माझ्या मनात नक्की आहे असेही सांगितले.
सुनिल तटकरे म्हणाले की, प्रस्ताव येणार की नाही याचीच माहिती नाही त्यामुळे अनुकुल आणि प्रतिकुलचा विषय काय येतो. सभागृहात मतदान होते त्यावेळी अनुकुल असेल त्यांनी हात वर करावे आणि प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे असे घडते मात्र तसे काही इथे नाही. इथे एकेकाळी सर्वांनी एकत्रितपणे काम केले आहे पण दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वच्छपणाची भूमिका घेतली. बहुजन समाजाचे व्यापक हित होत असेल तर आणि यशवंतराव चव्हाण यांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेत आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. महाराष्ट्रातील जनतेने त्याचे स्वागत केले. आता मुद्दा आला विलिनीकरणाचा पण दादा असताना ती चर्चा झाली पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सर्वच काही बदललं असल्याची आठवण यावेळी करून दिली.
शेवटी बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, मी प्रफुल पटेल आणि पार्थ पवार सोमवारपासून दिल्लीत अधिवेशनात असणार आहे. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतची नोटीस आली आहे त्यावर सविस्तर चर्चा करु आणि बुधवारी कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झालेली असल्याचेही यावेळी सांगत वहिनींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित भेट घेणार आहोत. अनेक बाबींवर, विषयांवर चर्चा करायची आहे. त्यात अर्थखाते हाही विषय असल्याचे सांगितले.
