राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही अजित पवार गेले याचे वास्तव अद्यापही वाटत नाही. परंतु निसर्ग नियमानुसार अजित पवार यांच्या मृत्यू झाला हे कटू सत्य स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. आज पासून अर्थसंकल्पिय अधिवेशऩाला सुरूवात झाली. प्रथे प्रमाणे विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक नेत्यानी अजित पवार यांच्याशी असलेल्या संबधाना उजाळा दिला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार आणि आम्ही कधी एकत्र येऊ असं वाटलंही नव्हतं. कारण दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात होते. आपल्या रोजच्या जीवनात दोन सकाळ असे पाहिले आहेत, की एका सकाळी अजित पवार यांनी सर्वांना धक्का दिला. तर दुसऱ्या एका सकाळच्या बातमीने महाराष्ट्र हळहळला असल्याची आठवण सांगत पुढे म्हणाले की, आम्ही अनपेक्षित एकत्र आलो, मनात एक अढी होती. मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. मी मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. मला एक धक्का दिला होता आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बसणार हे मला अनपेक्षित होतं. कामकाज सुरु झाल्यानंतर कळलं की, अजितदादां सारखा उत्तम, दिलदार सरकारी मित्र मी गमावला आहे. शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजात अजित दादांचा मला आधार होता, एखादी गोष्ट अजित दादांशी मी बोलायचो, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा त्यांचा स्वभाव होता. सहा वेळा अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. पण एक गोष्ट महत्वाची वाटते की, एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली. काही जणांना वृक्षाच्या सावलीत आयुष्यभर रहावं लागतं, पण काही जण असे असतात जे स्वतःची ओळख निर्माण करतात त्यातचे अजित पवार होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी दोन-तीन वेळा बारामतीला गेलो होतो, त्यावेळी माझ्या प्रकृतीची तक्रार होती. अजित दादा तेव्हा माझ्याबरोबर ठरवून आले होते. बारामतीचा कायापालट त्यांनी दाखवला होता. ते सगळं अचंबित करणारं होतं. रस्ते, मोठ्या संस्था, विद्यालयं सगळं मला त्यांनी दाखवलं. त्याच बारामतीत दुर्घटना घडली, अजित पवार गेले आणि बारामती पोरकी झाली हे मला जाणवून गेलं. आनंदाने भरलेली बारामती पोरकी झाल्याचं मला जाणवलं. लॉकडाऊनच्या काळात मंत्रालय बंद होतं, अर्थचक्र थांबतय की काय असे वाटत असतानाच महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरु ठेवलं आणि कुठलीही योजना बंद पडू दिली नाही अशी आठवणही यावेळी सांगितली. प्रशासन चालविण्यासाठी कसब लागतं ते अजित पवार यांनी दाखविलं असेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अजित दादांची आठवण कायम येतच राहील, अलिकडच्या काळात अजित पवाराचं एक वक्तव्य होतं की, ज्यांनी त्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्याबरोबर मी सत्तेत आहे. हे मी का सांगतोय माणूस असतो त्यावेळी त्या व्यक्तीला किती बदनाम करतो, एखाद्यावर किती आरोप करायचे, त्याला आयुष्यातून उठवायचे यावर आपण मर्यादा ठेवली पाहिजे. त्यांच्यावर इतके आरोप झाले. पण त्यांनी सगळ्या आरोपांना तोंड दिले. अजित पवार कधीही खचून गेले नाहीत. अजित पवार यांच्या कामाचा अनुभव येथे बसलेल्या प्रत्येकाने घेतला आहे. त्यांना अधिकारीही वसकून असायचे त्यांच्या आवाजात एक भारदस्तपणा होता, बोलतानाही बिनधास्त बोलायचे. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना अडचणीत आणलं आहे हे आपण पाहिलं आहे. कारण त्यांच्या मनात पाप नसायचं अशी आठवणही यावेळी सांगितली.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचं अर्थखातं अजित पवार यांनी सांभाळलं, मला अनुभव नसताना त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. घड्याळ आणि नेळ त्यांचं अतूट नातं होतं. घड्याळ ही निशाणी त्यांच्यासाठीच होती की काय अजित पवार ठरल्या वेळेत येणार म्हणजे येणारच. अजित पवारांच्या समोरचं टेबलही नीट आवळलेलं आणि काटकोनात असायचं, माणूस शिस्तीचा असेल तर सगळा कारभारही शिस्तीने केला जातो. आज आपण एका अशा दुःखात आहोत की आपल्या जवळंच कुणी तरी गेलं आहे. अशी भावना फार थोड्या व्यक्तींबाबत आपल्या मनात निर्माण होते. महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व गमावलं आहे. अजित पवार यांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर हा फक्त पवार कुटुंबावर नाही तर सगळ्या महाराष्ट्रावर कोसळला असल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली.
