भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेतून महिना १५०० रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत महिलांची मते घेतली. आता सत्तेत आल्यानंतर या सरकारला निकष, अटी, शर्थी दिसू लागल्या आहेत. सरकारने निकष लागू करत ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा क्रूर निर्णय घेतला आहे. मते हवी होती त्यावेळी कोणतेही निकष न पाहता योजना जाहीर केली आणि सत्ता मिळाल्यानंतर मात्र निकष आठवले, ही लाडक्या बहिणींची क्रूर थट्टा व विश्वासघात आहे, असा हल्लाबोल करत योजना जाहीर करताना झोपेत जाहीर केली का?, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड विचारला.
भाजपा महायुती सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी या योजनेचे पैसे १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासनही दिले. राज्यातील महिलांनी महायुतीच्या आश्वासनावर विश्वास ठेवत मते दिली पण सत्तेत आल्यानंतर मात्र महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहिण योजनेला कात्री लावण्यास सुरुवात केली. मागील दोन वर्षात महायुती सरकारने सातत्याने लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी अनेक हातखंडे वापरले. नियम, अटी, शर्ती लागू करत आता तब्बल ८० लाख महिलांना या योजनेतून अपात्र केले आहे. सरकारचा हा निर्णय राज्यातील लाखो महिलांची फसवणूक आहे, असेही सांगितले.
शेवटी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा महायुती सत्तेत येण्यासाठी वारेमाप आश्वासने देते आणि सत्तेत आल्यानंतर मात्र त्याची पूर्तता करत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले होते की, “जाहीर करायला आपल्या बापाचे काय जाते”? अशी मस्ती व सत्तेचा अहंकार यांच्यामध्ये भरलेला आहे. २१०० रुपये देण्याच्या आश्वासनचा तर भाजपा, महायुतीला विसर पडलेला आहेच पण आता आहे ते पैसेही लाडक्या बहिणांना देण्याचे बंद करत आहेत. सत्तेतील भावांची ही वागणूक सावत्रपणाची आहे, अशी भावना लाडक्या बहिणींमध्ये असल्याचेही यावेळी सांगितले.
