Marathi e-Batmya

वर्षा गायकवाड यांचा सवाल, IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडेची संस्थात्मक हत्या, हत्येस जबाबदार प्राध्यापकाला अद्याप अटक का नाही?

IIT बॉम्बे या संस्थेतील मागासवर्गीय विद्यार्थी साहिल वाकोडे याची छळ करून केलेली संस्थात्मक हत्या आहे. या घटनेला एक महिना झाला तरी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. मागील १३ महिन्यात या संस्थेतील ४ विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले आहेत. साहिलच्या हत्येप्रकरणी अद्याप काहीच कारवाई झाली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्राध्यापकाला तत्काळ अटक करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने साहिलच्या पालकांसह आयआयटी बॉम्बे या संस्थेला ला भेट दिली व कारवाईबाबत विचारणा केली. यावेळी आमदार अस्लम शेख, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, सुभाष भालेराव, जयवंत लोखंडे, केतन शाह यांच्यासह अनेक विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. आयआयटी पवईच्या रजिस्ट्रार यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी साहिल वाकोडे याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

खासदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणल्या की, “साहिलचा मृत्यु होवून एक महिना उलटून गेला आहे, तरीही अद्याप न्याय मिळालेला नाही. त्याला न्याय मिळावा, ही त्याच्या पालकांची आणि आमचीही मनापासून इच्छा आहे. IIT बॉम्बे या संस्थेत आतापर्यंत १४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना झालेल्या आहेत, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करा. साहिल वाकोडे प्रकरणी आयआयटी पवई मधील विद्यार्थी आंदोलन करत असताना पोलीसांनी संस्थेत घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. हे विद्यार्थी आहेत, ते काय गुन्हेगार आहेत का? आयआयटी संस्थेच्या परिसरात पोलीस अत्याचार कोणाच्या आदेशाने होत आहेत? हे सर्व प्रकार थांबले पाहिजेत. साहिलला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असा इशाराही खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

आयआयटी बॉम्बे या नामांकित संस्थेत आरएसएसच्या विचाराचा शिरकाव झाला आहे, हे शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत घातक आहे. बी.टेक.च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याचा १८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्यावर खोटे आरोप करून बदनाम केले जात आहे. साहिलचे कुटुंबीय, विविध विद्यार्थी संघटना आणि काँग्रेस नेते या घटनेची पारदर्शक चौकशी करून संबंधित प्राध्यापकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आहेत असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Exit mobile version