Marathi e-Batmya

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही तर काय?

ब्रेंट क्रूड आंतरराष्ट्रीय बाजारात $१००  च्या खाली घसरलंय, कच्चं तेल स्वस्त झालंय. पण भारतात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत! गेल्या १० दिवसांत इंधन दरवाढ तब्बल ७ रुपयाने झालीये. हा थेट सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही तर काय? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाच्या सरकारला केला.

विजय वडेट्टवार पुढे बोलताना म्हणाले की, क्रोनोलॉजी समजून घ्या, जागतिक बाजारात क्रूड महागलं की लगेच सरकारला जागतिक संकट आठवतं, अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचं रडगाणं सुरू होतं. जागतिक बाजारात क्रूड स्वस्त झालं की सरकार एकदम मौनात जातं, दरकपातीचा पत्ताच नसतो असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, दरवाढ करायची असेल तर ती एका रात्रीत, तात्काळ होते, पण आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्यावर दरकपात मात्र कधीच होत नाही. हा डायनॅमिक प्रायसिंगचा खेळ फक्त जनतेला लुटण्यासाठीच सुरू आहे का? असा सवालही यावेळी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशातील जनता मूर्ख नाहीये. निवडणुका आल्या की पेट्रोलचे दर जैसे थे असतात आणि निवडणुका संपल्या की जनतेच्या खिशावर सर्जिकल स्ट्राईक सुरू होतो! म्हणजेच भाजपासाठी जनता ही फक्त मतदान करण्यापुरती आणि नंतर वसुली करण्यासाठी एटीएम ATM मशीन ठरली आहे. मोदी सरकारने स्पष्ट उत्तर द्यावं, क्रूड स्वस्त झाल्यावरही भारतात पेट्रोल-डिझेल महाग का? जनतेच्या घामाचा पैसा नक्की कुठे जातोय? की काही मोजक्या उद्योगपती मित्रांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हा देश लुटला जातोय? अशी प्रश्नांची सरबत्तीही सरकारवर केली.

Exit mobile version