राज्यात १५ वर्षात काही अंतराने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषणविणारे भाजपाचे नेते तथा विद्यमान संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना आता महाराष्ट्रावरच लक्ष्य केंद्रीय करून रहावे लागणार असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान विदर्भात केलेल्या घोषणेचे स्वप्न आता अधुरे राहणार असल्याची चर्चा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गोटात सुरु झाली आहे.
वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केलेल्या घोषणेप्रमाणे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असे एक प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला होता. तर शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना उतरता पाणी देख मेरे किनारे घर ना बसा मै फिर लौट आऊंगा अशी शायरी करत इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते पदी असताना विरोधकांना दिला.
मात्र त्यावेळच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावध पवित्रा घेत त्यावेळच्या फडणवीसांच्या घोषणेच्या नेमकी उलट प्रतिक्रिया व्यक्त करत त्या घोषणेपासून चार हात लांब असल्याचे अप्रत्यक्ष दाखवून दिले. मात्र त्यानंतर महाराष्ट्रात लगेच सत्तेत आले नसल्याने त्यांची त्यावेळची घोषणा आणि स्वप्न अर्धवट राहिले. त्यानंतर त्याच घोषणेची पुनरावृत्ती २०२४ च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान विदर्भात केली. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आल्याने त्यांचे दिल्लीत जाऊन केलेल्या घोषणेनुसार त्याची अंमलबाजावणी किंवा सत्यात उतरवून दाखविणे आणखी दुरापास्त होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस दिल्लीला कधी जाणार त्यांचे ते पुन्हा एकदा अर्धवट राहिलेले स्वप्न कसे पूर्ण होणार याची काळजी अनेक देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या २०१९ च्या आणि २०२४ च्या निवडणूकीच्या प्रचाराच्या भाषणात एकच साम्य असून त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या अर्थात लोकसभेच्या निवडणूकीसाठी केलेल्या घोषणेची प्रतिपूर्ती लवकरच दिल्लीला जावून करावी अशी मागणी आता भाजपातून करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी फडणवीस हे विदर्भातील एका जिल्ह्यात प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खासदार औवेसी यांना आव्हान आणि चॅलेंज देताना म्हणाले होते की, अरे ओ औवेसी औरंगजेब की पेहचान की कबर पर तो कुत्ता भी पेशाब न करे, हम तो तो पुरे पाकिस्तान पे तिरंगा लेहरानेकी…. अशी घोषणा केली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यानही देवेंद्र फडणवीस यांनी अशीच घोषणा करत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश सह अखंड भारत निर्माण करण्याचा आमचा संकल्प असल्याची घोषणा केली होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या धुरिणांनी असा कोणताही संकल्प संघाच्या आणि भाजपाच्या अजेंड्यावर नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करण्याचे आणि पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानसह अखंड भारत निर्माण करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमुळे पुन्हा एकदा अडगळीत टाकण्याची वेळ आली आहे. परंतु भाजपाच्या नियमानुसार ७० पार झाली राजकारणातून निवृत्त करण्याची प्रथा भाजपामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही निवृत्तीचे जवळ आलेले असल्याने त्यांच्या रिक्त जागेवर अखंड भारताच्या निर्माणासाठी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते मात्र त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सारखा निष्ठावान सहकारी मिळणार का हा मोठा यक्षप्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असल्याचेही बोलले जात आहे. मात्र एक खरे की देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमुळे स्वप्न पुन्हा एकदा अर्धवट रहात आहे.
