Marathi e-Batmya

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळेचा तेलंगणातील तो व्हिडिओ व्हायरलः काँग्रेसची टीका

तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत माढिगा समाजाच्या आरक्षण वर्गिकरणाच्या मागणीसह तेलंगणाच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. नेमके त्याच वेळी एका तरूणीने सभास्थळी असलेल्या वीजेच्या खांबावर चढून पंतप्रधान मोदी यांचे खऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे ट्विट करत म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेलंगणातील प्रचारासाठी भाषण करत आहेत. मात्र नेमके त्याचवेळेस तेथील एका वीज वाहक खांबावर चढून एक मुलगी पंतप्रधानांचे खऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या व्हिडोओतील घडलेली घटना पाहताना फारच अवघड वाटत होते.

पुढे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, मोदी सरकारच्या धोकेबाजीमुळेच देशातील तरूणाई कंटाळली असल्याचा आरोप करत मागील ४५ वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी देशात निर्माण झाली आहे. तरूणाईला आर्थिक विकास हवा आहे. परंतु पंतप्रधान मोदी हे भाषणा दरम्यान बाजारात वाढलेल्या किंमती कमी करण्याचे आश्वासन देत आहे. या दर वाढीमुळे नागरिकांची बचतही सर्वाधिक खालच्या स्तरावर पोहोचल्याची टीका केली.

मल्लिकार्जून पुढे बोलताना म्हणाले की, तरूणाईला सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासातील समानता हवी आहे. परंतु मोदी सरकार त्यांना आर्थिक क्षेत्रातील विषमता वाढविण्याच्या गोष्टी देत आहे. ५ टक्के श्रीमंत व्यक्ती देशाच्या ६० टक्के मालमत्तेचे मालक झाले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिक हे दुःखी कष्टी बनत चालल्याची टीकाही केली.

सामाजिक प्रश्नांबाबत बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, देशातील महिला आणि मुले यांचे जीवन आता सुरक्षित राहिले नाहीत. तसेच देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदी सरकारने महिला, मुले, आदिवासी, वंचित, मागास जमातींना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्या विरोधात गुन्हे घडताना दिसत आहेत. त्यामुळे देशात गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे.

मल्लिकाजून खर्गे म्हणाले की, विविधता असलेल्या आपल्या या देशात सर्वांना एकता आणि शांतता हवी आहे. परंतु त्यांना तिरस्कार- द्वेषमुलक, दोन धर्मियांमध्ये फाटाफूट निर्माण करण्याच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मोदी सरकार आणि भाजपा देशाच्या नव्या पिढीची स्वप्ने तोडून टाकत आहेत असा आरोपही केला.

Exit mobile version