Marathi e-Batmya

कर्नाटकच्या सरकारला राहुल गांधी यांचे आवाहन, महादेवपुरातील मतचोरीची चौकशी करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की, निवडणूक आयोग (EC) इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि मतदान केंद्राचे व्हिडिओ शेअर करण्यास नकार देऊन “मोठा गुन्हा लपवत आहे”. कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कथित चोरीला आळा घालण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

बेंगळुरू येथील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी दावा केला की २०२४ च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार यादीत फेरफार करण्यात आला आणि संविधानात नमूद केलेल्या “एक व्यक्ती एक मत” या तत्त्वाचे उल्लंघन करण्यात आले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात कर्नाटकातील किमान १६ जागांवर पक्ष पुढे असल्याचे दिसून आले होते, परंतु त्यांना फक्त नऊ जागांवर यश मिळाले. त्या दिवशी, आम्हाला निवडणुकीत काहीतरी गडबड असल्याचे आम्हाला वाटले, तसेच मतदान केंद्रांवरून इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी निवडणूक आयोगाकडे केलेल्या विनंत्या वारंवार नाकारण्यात आल्याचे सांगत नंतर कायदा बदलून ४५ दिवसांनी व्हिडिओ मिटवणे बंधनकारक करण्यात आल्याचा आरोपही यावेळी केला.

राहुल गांधी यांनी बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात सहा महिन्यांच्या चौकशीतून आपल्या पक्षाचे निष्कर्ष सादर करताना, राहुल गांधी यांनी मतदारांच्या फसवणुकीचे “१०० टक्के पुरावे” असल्याचा दावा केला.

राहुल गांधी यांच्या मते, डुप्लिकेट मतदार, बनावट किंवा अवैध पत्ते, भाजपा नेत्यांशी जोडलेल्या एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात नोंदणी, गहाळ किंवा अस्पष्ट छायाचित्रे आणि पहिल्यांदाच मतदारांसाठी असलेल्या फॉर्म ६ चा संशयास्पद वापर यासारख्या पद्धतींद्वारे सुमारे एक लाख मते “चोरी” करण्यात आली. राहुल गांधी यांनी असाही आरोप केला की, काही डुप्लिकेट मतदारांना अनेक राज्यांमध्ये मतदान करण्यासाठी अधिकृत केले गेले होते.

राहुल गांधी म्हणाले की, ईसी आणि भाजपाने मिळून कर्नाटकमधून लोकसभा चोरली आहे, सार्वजनिक तपासणी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमधील राज्य मतदार यादी वेबसाइट बंद केल्याचा आरोप केला.

राहुल गांधी यांनी गेल्या १० वर्षांपासून संपूर्ण देशासाठी इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि मतदानाच्या दिवसाचे व्हिडिओग्राफी रेकॉर्ड जाहीर करण्याची मागणी केली आणि असे म्हटले की जर ते सार्वजनिक केले तर ते “भारताचे पंतप्रधान मते चोरून पंतप्रधान झाले, हे सिद्ध करतील.
कथित फसवणूकीला “कर्नाटकच्या लोकांविरुद्ध गुन्हेगारी कृत्य” असे संबोधून राहुल यांनी कर्नाटक राज्य सरकारला याद्यांमध्ये बनावट नावे जोडल्याबद्दल चौकशी करून अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचे आवाहन केले. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला की ते ही मत चोरी “लपवू शकत नाहीत” त्यांना विरोधकांना उत्तर द्यावे लागेल.

राहुल गांधी यांनी भाजपाच्या मानसिकतेवर जोरदार टीका करताना म्हणाले की ते “संविधानाविरुद्ध” आहे आणि गरीब, लहान व्यापारी आणि सामान्य लोकांवर हल्ला करण्यासाठी या युक्त्यांचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता संविधानाचे आणि नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करण्यासाठी उभा राहील असा इशाराही यावेळी दिला.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, समय लागेगा, मगर हम आपको पकडेंगे (वेळ लागेल, पण आम्ही तुम्हाला पकडू), जर तुम्ही संविधानावर हल्ला केला तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू. हा देशाचा आवाज असल्याचा गर्भित इशाराही यावेळी दिला.

Exit mobile version