पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या या आवाहनाला त्यांनी ‘अपयशाचा’ पुरावा म्हटले आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “काल मोदीजींनी जनतेला त्याग करण्यास सांगितले—सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खते आणि खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उपदेश नाहीत—हे अपयशाचे पुरावे आहेत,” अशी टीका ‘एक्स’वरील एका पोस्टच्या माध्यमातून केली.
मोदी जी ने कल जनता से त्याग मांगे – सोना मत ख़रीदो, विदेश मत जाओ, पेट्रोल कम जलाओ, खाद और खाने का तेल कम करो, मेट्रो में चलो, घर से काम करो।
ये उपदेश नहीं – ये नाकामी के सबूत हैं।
12 साल में देश को इस मुक़ाम पर ला दिया है कि जनता को बताना पड़ रहा है – क्या ख़रीदे, क्या न…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 11, 2026
रविवारी हैदराबादमध्ये भाजपाच्या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्ष आणि भारताच्या परकीय चलन साठ्यावरील दबावाचा हवाला देत जनतेला अनेक आर्थिक त्याग करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ही टिप्पणी आली आहे.
पंतप्रधानांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे, मेट्रो सेवेचा वापर करण्याचे, कारपूलिंग करण्याचे, इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे आणि शक्य असेल तिथे घरून काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकांना एक वर्षासाठी सोन्याची खरेदी आणि परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे, तसेच खाद्यतेल आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे आवाहनही केले.
कोविड-१९ महामारीच्या काळात अवलंबलेल्या वर्तणुकीतील बदलांशी तुलना करत पंतप्रधान मोदी सभेत म्हणाले, “आपल्याला कोणत्याही परिस्थितीत परकीय चलन वाचवायचे आहे. कोविड-१९ दरम्यान आपण वर्क-फ्रॉम-होम, व्हर्च्युअल मीटिंग्ज, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर अनेक पद्धती अवलंबल्या. आपल्याला त्यांची सवय झाली. आता त्या पद्धती पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.”
