मुंबईत एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत बोटीतील १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली असून १०१ जणांना वाचविण्यात यश आलं आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियाना ५ लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
या बोट दुर्घटनेसंदर्भात कळालेली माहिती अशी की, नीलकमल नावाची फेरी बोट एलिफंटाकडे जात होती. या बोटीवर १०० पेक्षा जास्त प्रवाी होते. मात्र ही बोट गेटवे ऑफ इंडिया जवळ असतानाच बुडाली असल्याची दुर्घटना घडली. दुर्घटना घडल्यानंतर लगेचच मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी नौदलाने १०१ प्रवाशांना वाचविण्यात यश मिळवलं. तर या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. पोलिस आणि नौदलाच्या समन्वयाने बचावकार्य सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या मध्ये नौदलाचे चार हेलिकॉप्टर, एक तटरक्षक दलाची नौका आणि तीन सागरी पोलिसांच्या नौका बचाव कार्यात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा
एलिफंटाजवळ प्रवाशी बोट बुडालीः पण २१ जणांना वाचविण्यात यश
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नीलकमल कंपनीची फेरीबोट मुंबई शहराजवळ असलेल्या अरबी समुद्रात बोट बुडाली. एकूण प्रवाशांपैकी १०१ प्रवाशांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. नौदलाचे व्हाईस अॅडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असून त्यात नौदलाचे तीन जवान तर १० बोटीतील प्रवाशांचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २ नौदलाचे जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे सांगत प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच या घटनेची नौदल आणि राज्य सरकारकडून चौकशी करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं. 7.30 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या… https://t.co/JMSVccvFg5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2024
