Marathi e-Batmya

विनयभंग करणाऱ्यास जाब विचारल्याने २० वर्षिय तरूणीला रेल्वे रुळावर ढकलले

४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नायगाव रेल्वे स्थानकावर, एका लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान एका व्यक्तीने छेडछाड करून एका २० वर्षीय तरुणीला रेल्वे रुळावर ढकलून दिले, ज्यामध्ये तिचा डावा हात निकामी झाला (तुटला गेला).

ही घटना तेव्हा घडली जेव्हा ती तरुणी गोरेगाव येथे आपल्या बहिणीला भेटून बोरीवलीवरून नायगाव (पूर्व) येथील आपल्या घरी परतत होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास एका अज्ञात प्रवाशाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. नायगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तिने त्या व्यक्तीला जाब विचारला.

यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. तिने आपली चप्पल त्या व्यक्तीच्या दिशेने भिरकावली, प्रत्युत्तरात त्यानेही आपली चप्पल तिच्या दिशेने फेकली आणि तिला जोरात रेल्वे रुळांच्या दिशेने ढकलून दिले.

लोकल ट्रेन सुरू होत असतानाच ती दोन डब्यांच्या मधल्या फटीतून खाली पडली आणि तिला पुन्हा प्लॅटफॉर्मवर चढता आले नाही.
पोलिसांनी सांगितले की, ट्रेनच्या चाकाखाली आल्यामुळे तिचा डावा हात कोपरापासून वेगळा झाला. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत आहे.

या घटनेत तिच्या डोक्यालाही दुखापत झाली असून, तिला १६ टाके पडले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी सांगितले की, पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली आणि ९ नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली.

Exit mobile version