Marathi e-Batmya

आदित्य ठाकरे यांचे उद्विग्न उद्गार ,… आणि भ्रष्टाचार पाहून मी थक्क झालो

मुंबईतील कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांनी खटला दाखल करून घेत मुंबई महापालिका आणि शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकायुक्त कार्यालयाने नोटीस बजावली होती. त्यानुसार आदित्य ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे ही हजर होते. यावेळी लोकायुक्तांनी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजीची तारीख ठेवली आहे.

पहिली सुनावणी झाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, आज मी मुंबई महापालिकेच्या विरुद्ध दाखल केलेल्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांसमोर सुनावणी झाली. ह्यावेळी मी प्रत्यक्ष उपस्थित होतो. ह्याप्रकरणी पुढच्या सुनावणीसाठी २३ एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी, महानगरपालिकेला लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज सुनावणीच्या पहिल्याच दिवशी, घटनाबाह्य ‘सीएम’च्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना पाठीशी घालण्यासाठी पालिकेच्या आयुक्तांचे सुरू असलेले प्रयत्न, भ्रष्टाचार पाहून मी थक्क झालो ! असे उद्विग्न उद्गार काढत आदित्य ठाकरे म्हणाले की काँट्रॅक्टरला मदत करण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेने आता निविदेचे विभाजन केले आहे. निविदेची छाननी सुरू असताना आणि त्याबाबत लोकायुक्तांसमोर सुनावणी असूनही २११ कोटींची निविदा काढण्यात आली असल्याचा आरोप केला.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे, भाजपाच्या एका आमदाराने (श्रेय लाटण्यासाठी) गेल्या वर्षी विधानसभेत टेंडर रद्द झाल्याचे जाहीर केले होते. विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने असे जाहीर करूनही निर्लज्ज आणि घटनाबाह्य ‘सीएम’ उघड उघड काँट्रॅक्टरला संरक्षण देत आहेत. भाजपाच्या आमदाराने विधानसभेची दिशाभूल का केली आणि भाजपाने ह्या घोटाळ्यावर ‘यू टर्न’ का घेतला, ह्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं अशी मागणीही यावेळी केली.

Exit mobile version