Marathi e-Batmya

ईएसआयसी अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल; राजेश शर्मा यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते राजेश शर्मा यांनी अंधेरी (पूर्व) येथील ईएसआयसी मॉडेल रुग्णालय निर्धारित मुदतीत सुरू न केल्याप्रकरणी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे कथितपणे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याबद्दल कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली.

याचिकेनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने १६ एप्रिल २०२५ रोजी जनहित याचिका क्र. ८/२०२४ निकाली काढताना ईएसआयसीला १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करून ताबा घेण्याचे आणि ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रुग्णालय पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाने दिलेली मुदत संपूनही रुग्णालय अद्याप अपूर्ण असून सुरू करण्यात आलेले नाही.

अवमान याचिका दाखल करण्यापूर्वी ६ फेब्रुवारी २०२६ आणि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ईएसआयसीला कायदेशीर नोटिसा बजावून उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही प्रभावी कार्यवाही करण्यात आली नाही.

यासंदर्भात राजेश शर्मा म्हणाले, “२०१८ मधील भीषण आगीपासून जवळपास आठ वर्षे हजारो विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. उच्च न्यायालयाने हे महत्त्वाचे सार्वजनिक रुग्णालय सुरू करण्यासाठी स्पष्ट मुदत निश्चित केली होती. मात्र, ईएसआयसीने ना आपली आश्वासने पाळली, न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान केला. लाखो लाभार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या अशा प्रकरणात कोणत्याही सार्वजनिक संस्थेला न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्याची मुभा देता येणार नाही.”

या अवमान याचिकेमध्ये न्यायालयाचा अवमान अधिनियम, १९७१ अंतर्गत संबंधित ईएसआयसी अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या अवमान याचिकेवर  मुंबई उच्च न्यायालयात मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सुनावणी होणार आहे.

Exit mobile version