Marathi e-Batmya

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल

वरळी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. लोअरपरेल येथील शिवसेना शाखा क्रमांक १९८ येथून भव्य मिरवणुकीत स्थानिक मतदाराही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. उमेदावारी अर्ज दाखल करताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते.

आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसैनिकांकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठं शक्तीप्रदर्शन वाजत-गाजत जयघोशात मिरवणूकीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, माजी उपमहापौर शुभांगी वरळीकर आदी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version