Marathi e-Batmya

अहिंसावादी महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशीच पोलिसांकडून बळाचा वापर

आज दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. या जयंतीचे औचित्य साधत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या धोरण आणि मनमानी पध्दतीच्या कारभारा विरोधात इंडिया आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी मै भी गांधी ही पदयात्रा काढली. परंतु, सदरची पदयात्रा फॅशन स्ट्रीटजवळ पोहोचताच पोलिसांनी पदयात्रा रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेडस तोडून सदरची पदयात्रा पुढे जायला बघत होती. त्यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

इंडिया आघाडीचे कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. तसेच इंडिया आघाडीने पदयात्रेला दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते महात्मा गांधी पुतळा अशी पदयात्रा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु, सदरचा परिसर हा शांतता क्षेत्र असल्याने आणि उच्च न्यायालयाचे वेगवेगळे निर्बंध असल्याचे कारण पुढे करत पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर पोलिसांनी रिगल सिनेमा ते गांधी पुतळा या मार्गाने पदयात्रा काढण्यास परवानगी दिली होती. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, संजय निरुपम, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसीम आझमी, ठाकरे गटाचे अनिल देसाई, सचिन अहिर, आम आदमी पार्टीच्या प्रिती मेमन-शर्मा आदी नेते या पदयात्रेत सहभागी झाले होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

या पदयात्रेवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आमदार वर्षा गायकवाड प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीने शांततेच्या मार्गाने एक पदयात्रा काढली होती. प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देणं हा या पदयात्रेचा एकमेव उद्देश होता. परतु, गांधी जयंतीच्या दिवशीच आमच्या पदयात्रेवर कारवाई करण्यात आली. आमची पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. नथुराम गोडसेचे पुजारी गांधीजींचा आवाज दाबू शकत नाहीत असा इशाराही भाजपा सरकारला दिला.

Exit mobile version