Marathi e-Batmya

नो बॅनर साठी आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

२०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

आदित्य ठाकरे पुढे लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होत असल्याची खंतही या पत्रातून व्यक्त केली.

पुढे आपल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत. आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

ह्यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल. जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत अशी बाबही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नजरेस आणून दिली.

पुढे आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र पाठवित म्हणाले की, मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यादिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण ह्या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील असेही यावेळी मुख्यमंत्री फड़णवीस यांना आवाहन केले.

Exit mobile version