केंद्रात स्थानापन्न असलेल्या भाजपाच्या राजकिय भूमिकेच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, आणि काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत चांगल्यापैकी यश मिळाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पराभवाची नामुष्की स्विकारावी लागली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाकडून आगामी निवडणूका स्वतंत्र लढण्याची भाषा सुरु केली असून या पराभवाला काँग्रेसला जबाबदार धरले आहे.
शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेत, विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा अति आत्मविश्वास नडला असल्याचे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढणार असल्याची भूमिकाही यावेळी जाहिर केले.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत जास्त जागा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनात जास्त आत्मविश्वास आला असावा, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस जिंकू शकत होती अशी स्थिती होती. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे आणावा अशी भूमिका घेतली होती. यासंदर्भात वेळोवेळी संजय राऊत यांनीही बोलून दाखविली होती. परंतु या भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विरोध केला. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेवता, निवडणूक लढविली. मुख्यमंत्री पदाबाबत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ठरविण्यात येईल अशी भूमिका महाविकास आघाडीने जाहिर केली. मात्र याच भूमिकेमुळे महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्क्याने पराभव स्विकारावा लागल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, कोणतं खातं मिळावं याकरिता काँग्रेस चर्चा करत होते. मुख्यमंत्री पदासाठी १० जण इच्छुक होते हे सत्य होते. जर उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलं असतं तर २-५ टक्के जास्त मतं मिळाली असती अशी शक्यताही यावेळी व्यक्त केली.
विधानसभा निवडणूकीत ९५ जागा लढवून शिवसेनेला केवळ २० ठिकाणी विजय मिळाला, त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूकीला सामोरे जाण्याची भाषा शिवसेना उबाठाने सुरु केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा सूर शिवसेना उबाठामध्ये सुरु असल्याची चर्चा जोर धरत आहे. यावर संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. जरी तशी चर्चा जरी जोर धरत असली तर ती भूमिका काही निवडक कार्यकर्त्यांची आहे. पण अद्याप शिवसेनेने अद्याप तशी भूमिका घेतली नसल्याचेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.
