Marathi e-Batmya

अमित शाह यांच्या वक्तव्याचे राज्याच्या विधिमंडळातही पडसादः मविआचा सभात्याग

संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले.

यावेळी विधान परिदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, सभागृहात आम्ही गृहमंत्र्यांच्या उद्गारावर निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्ड वर न यावे यासाठी सभापती यांनी वेगळी भूमिका घेतली. गृहमंत्री यांचे उदगार हे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. महायुती त्यांचा आदर करत नाही का असा सवाल यावेळी केला.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो, मग केंद्रीय गृहमंत्री यांच्या उद्गाराचा मुद्दा का उपस्थित केला जात नाही असा सवाल करत अंबादास दानवे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

यासंदर्भात विधानसभेत काँग्रेसचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत या निषेध व्यक्त केला. त्यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी यावर पॉंईट ऑफ इन्फॉरमेशन द्वारे मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, राज्यसभेच्या कामकाजात झालेल्या मुद्यावर इथे चर्चा करण्याचा मुद्दा उपस्थित करता येत नाही. तसेच तेथील मंत्र्याने कोणत्या संदर्भाने उपस्थित केला, तो संदर्भ न देता तो मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने साईडलाईन केल्याचा संदर्भही तेथील मंत्र्यांनी दिला. तो संदर्भ मात्र द्यायचा नाही. मात्र सोयीचे वक्तव्य करायचे असे चालणार नाही. त्यामुळे याप्रकरणी तपासून विधानसभेच्या सदस्यांनी केलेले वक्तव्य रेकॉर्डवरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी केली.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तपासून निर्णय घेतला जाईल असे सांगत पुढील कामकाज पुकारले.

Exit mobile version