Marathi e-Batmya

अनिल परब यांचा गंभीर आरोप, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार

विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. तसेच राज्यातील सर्व डान्सबार बंद असताना हा एकमेव बार कसा सुरु असा सवाल करत या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान परिषदेत विचारले असता अनिल परब यांनी केलेले आरोप आपण ऐकले नाहीत. त्यामुळे नंतर त्यांच्याकडून मी समजून घेतो असे सांगत वेळ मारून नेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना अभय दिले.

यावेळी बोलताना अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, कांदिवलीतील सावली नावाचा डान्सबार आहे. पोलिसांनी अलीकडेच या बारवर धाड टाकत २२ बारबाला ताब्यात घेतले आहे. राज्यात डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरु आहे असा सवाल यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, कांदिवलीतील समता नगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी २२ गिऱ्हाईक आणि बारबालांना पकडलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील एफआयआरची कॉपी वाचली. त्यावेळी लक्षात आले की, बारच्या परवाना हा ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्योती रामदास कदम या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. त्यामुळे सरकारने योगेश कदम यांचा राजीनामा तातडीने घ्यावा अशी मागणी केली.

दरम्यान, दुसऱ्या एका प्रश्नावरील उत्तरे देण्यासाठी विधान परिषदेत आले होते, त्यावेळी शिवसेना उबाठा गटाच्या आमदारांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी काही अनिल परब यांनी केलेले आरोप ऐकले नाहीत. त्यामुळे नंतर त्यांना बोलावून त्यांच्याकडून मुद्दा समजून घेतो असे सांगितले.

Exit mobile version