पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये ६००० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही या क्षेत्रात पुढाकार घेत ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले असून, उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील पहिली फुल-स्टॅक क्वांटम हार्डवेअर प्रणाली ठरणार आहे. तसेच टाटा कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस आणि आयआयटी बॉम्बे यांच्या सहकार्याने देशातील पहिल्या क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजरवर काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही कंपन्यांनी हजारो किलोमीटर अंतरावर हॅक-प्रूफ क्वांटम कम्युनिकेशनमध्ये यश मिळवले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.
जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगून महाराष्ट्राला २०३० पर्यंत या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, आयशर पुणे चे प्रो.उमाकांत रासोल, आयबीएम इंडियाचे संचालक अमित सिंघवी, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच मंत्रालयातील अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, क्वांटम तंत्रज्ञान हे केवळ सायन्स फिक्शन राहिलेले नाही, तर संगणक, संवाद व्यवस्था, आरोग्य, वित्त आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारे पुढील पाऊल आहे. पारंपरिक संगणकातील ‘बिट्स’पासून ‘क्युबिट्स’पर्यंत झालेला प्रवास हा तंत्रज्ञानातील मोठा टप्पा असल्याचे सांगितले.
क्वांटमची संकल्पना सोप्या शब्दांत स्पष्ट करताना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ‘परिमाण आणि मापन’ यावर आधारित उदाहरण दिले. नकाशावर दिसणारे अंतर आणि प्रत्यक्षातील अंतर यातील फरक समजून घेण्याची मानवी क्षमता हीच पुढे क्वांटम तंत्रज्ञानाच्या रूपात विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी उद्योग क्षेत्र आणि तरुणांना या ‘क्वांटम क्रांतीत’ सहभागी होण्याचे आवाहन करत शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा, प्रोत्साहन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले. तसेच तंत्रज्ञानावर आपण आरूढ झालो नाही, तर तंत्रज्ञान आपल्यावर आरूढ होईल, असे सांगून त्यांनी क्वांटम युगात सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली.
क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणन, सुरक्षितता व संशोधन क्षेत्रात मोठे परिवर्तन
– मुख्य सचिव राजेश अग्रवाल
क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणन, सायबर सुरक्षितता, औषधनिर्मिती आणि शेतीसारख्या विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडणार असून, महाराष्ट्र शासन या क्षेत्रात सक्रियपणे काम करत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
क्वांटम संगणन पारंपरिक संगणनापेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करत असून, क्यूबिट्सच्या साहाय्याने एकाच वेळी अनेक गणना करण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण अत्यल्प वेळेत करता येते, असे त्यांनी सांगितले.
क्वांटम सुपरपोजिशनमुळे क्यूबिट एकाच वेळी शून्य आणि एक या दोन्ही स्थितीत राहू शकतो, ज्यामुळे संगणनाची गती घातांकी वाढते. याचा उपयोग औषध शोध, कृषी संशोधन आणि विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये होणार आहे. क्वांटम इनटँगलमेंट ही संकल्पना सुरक्षित संप्रेषणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भविष्यातील क्वांटम कम्युनिकेशन प्रणालींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे. सध्याच्या क्रिप्टोग्राफी प्रणालींवर क्वांटम संगणनाचा प्रभाव पडू शकतो, मात्र त्याचवेळी क्वांटम आधारित सुरक्षितता उपाय विकसित होत असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले.
भारतामध्ये तसेच जागतिक स्तरावर क्वांटम संशोधन वेगाने प्रगती करत असून, ५० ते १०० क्यूबिट क्षमतेच्या प्रणाली विकसित होत आहेत. काही प्रगत संगणकांनी अत्यंत जटिल समस्या अल्पावधीत सोडविल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, विविध संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यासोबत सहकार्याने काम सुरू आहे. पुणे आणि मुंबई येथील प्रमुख संस्था या संशोधनात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, केंद्र सरकारकडूनही स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले.
क्वांटम तंत्रज्ञानामुळे भविष्यातील प्रशासनात आमूलाग्र बदल– सचिव विरेंद्र सिंह
क्वांटम विज्ञान आता केवळ सैद्धांतिक किंवा प्रयोगशाळेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते प्रत्यक्ष जीवनातील उपयोगाकडे वेगाने वाटचाल करत आहे. संप्रेषण, आरोग्य, वित्त, ऊर्जा आणि विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्वांटम तंत्रज्ञान परिवर्तन घडवू शकते. यामुळे प्रशासन, राष्ट्रीय सुरक्षा आणि विविध क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी सांगितले.
क्वांटम संगणन, क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम सेन्सिंग या तंत्रज्ञानामुळे सध्याच्या तांत्रिक मर्यादा बदलण्याची क्षमता निर्माण होत आहे. मात्र, याचबरोबर धोरणनिर्मात्यांसमोर मोठी जबाबदारीही निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवोन्मेषाला चालना देणे, संशोधनासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करणे, कौशल्य विकास आणि उद्योगवृद्धी साधणे ही काळाची गरज आहे, असे सांगून आज योग्य धोरणात्मक निर्णय घेतल्यास देशाला या नव्या तांत्रिक युगात अग्रस्थानी स्थान मिळू शकते, असे सचिव विरेंद्र सिंह यांनी सांगितले.
क्वांटम तंत्रज्ञानाच्या ‘मायग्रेशन’ची गरज स्पष्ट करतांना विरेंद्र सिंह म्हणाले की, बदलत्या काळानुसार प्रशासनाने वेगाने या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. सार्वजनिक सेवांच्या भविष्यात क्वांटम तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.
दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरा होणारा ‘वर्ल्ड कॉन्टम डे’ आपल्याला हे स्मरण करून देतो की, क्वांटम विज्ञान जरी सूक्ष्म स्तरावर कार्य करत असले तरी त्याचा परिणाम समाजाच्या व्यापक स्तरावर जाणवणार असल्याचे सांगून क्वांटम तंत्रज्ञानाचा प्रशासन व धोरणनिर्मितीत प्रभावी वापर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन सचिव विरेंद्र सिंह यांनी केले.
महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी आभार प्रदर्शन केले.
क्वांटम तंत्रज्ञान भविष्यातील सर्वात मोठे गेमचेंजर– प्रा.उमांकांत रापोल
क्वांटम तंत्रज्ञान हे पुढील काही वर्षात जगभरात मोठा बदल घडवून आणणारे क्षेत्र ठरणार आहे. “क्वांटम मेकॅनिक्स समजणे अवघड आहे, हे केवळ सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर महान शास्त्रज्ञांनाही आव्हान ठरल्याचे आयशर (आयआयएसईआर) पुणे येथील प्रा. उमाकांत रापोल यांनी सांगितले.
जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालय येथे आयोजित परिषदेत पहिल्या विशेष सत्रात प्रा. उमांकांत रापोल यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत संकल्पना आणि भविष्यातील परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रा. रापोल यांनी सांगितले की, सध्या जग ‘दुसऱ्या क्वांटम क्रांती’च्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पहिल्या क्वांटम क्रांतीतून इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, एमआरआय यासारख्या तंत्रज्ञानांचा विकास झाला, तर दुसऱ्या टप्प्यात क्वांटम संगणण, सुरक्षित संप्रेषण प्रणाली आणि अत्यंत अचूक सेन्सर्स विकसित होत आहेत.
क्वांटम संगणणांची कार्यपद्धती स्पष्ट करताना त्यांनी ‘क्युबिट’ ही संकल्पना मांडली. पारंपरिक संगणकात माहिती ‘०’ किंवा ‘१’ स्वरूपात साठवली जाते, तर क्युबिटमध्ये दोन्ही अवस्थांचे एकत्र अस्तित्व शक्य असल्याने माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता घातांकी प्रमाणात वाढत असल्याचे सांगितले.
सुपरपोजिशन व इनटँगलमेंट या संकल्पना क्वांटम तंत्रज्ञानाचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. एंटँगलमेंट संदर्भात त्यांनी उदाहरण दिली. केंद्र शासनाने सुरू केलेल्या सुमारे ६००० कोटी रुपयांच्या ‘नॅशनल क्वांटम मिशन’चा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, देशात संशोधन, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान विकासाला मोठी चालना मिळत आहे. पुणे-मुंबई परिसरात मजबूत संशोधन परिसंस्था तयार होत असून महाराष्ट्रही क्वांटम मिशन सुरू करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
क्वांटम तंत्रज्ञानाचे उपयोग स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, औषधनिर्मिती व आरोग्य क्षेत्रात जलद संशोधन, अत्यंत सुरक्षित डिजिटल संप्रेषण, जीपीएसशिवाय अचूक नेव्हिगेशन, भूगर्भातील पाणी व खनिजांचा शोध आणि अत्याधुनिक सेन्सर्स व अणुघड्याळे या सर्व क्षेत्रांत क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत.
जगभरात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होत असताना भारतानेही वेळेत पावले उचलली आहेत. आता संशोधनाबरोबरच स्थानिक तंत्रज्ञान विकास आणि कौशल्यनिर्मितीवर भर देणे गरजेचे असल्याचे प्रा. रापोल यांनी सांगितले.
क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी
आगामी काही वर्षांत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले क्वांटम संगणन वेगाने विकसित होत असून जागतिक स्तरावर संशोधन व गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. या प्रगतीमुळे भविष्यातील सायबर सुरक्षेसमोर गंभीर आव्हाने उभी राहत असून यासाठी ‘क्वांटम -सेफ’ म्हणजेच क्वांटम -सुरक्षित धोरणात्मक सज्जता आवश्यक असल्याचे मत आयबीएम रिसर्चचे संचालक अमित सिंघी यांनी व्यक्त केले.
जागतिक क्वांटम दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित परिषदेत क्वांटम सुरक्षा आणि धोरणात्मक सज्जता या विषयावर संचालक सिंघी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी उपस्थित होते. यावेळी क्वॉंटम संगणक विषयातील जागतिक पातळीवरील घडामोडी, धोके आणि भारतासाठीच्या संधी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
क्वांटम संगणन ही केवळ तांत्रिक क्रांती नसून आर्थिक, औद्योगिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. योग्य वेळी पावले उचलल्यास भारताला या क्षेत्रात आघाडी घेण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे मत सिंघी यांनी यावेळी व्यक्त केले.
अमित सिंघी म्हणाले की, क्वांटम संगणनाचा वापर रसायनशास्त्र, औषधनिर्मिती, शेती, लॉजिस्टिक्स, मशीन लर्निंग तसेच हवामान अंदाज यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. विशेषतः जटिल गणिती समस्या सोडविणे, मोठ्या प्रमाणातील डेटामधून नमुने शोधणे आणि प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करणे यामध्ये या तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती अपेक्षित आहे. आर्थिक क्षेत्रातही क्वांटम संगणनामुळे अचूक अंदाज बांधण्याची क्षमता वाढत असून काही उदाहरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक अचूकता सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.
जागतिक स्तरावर क्वांटम संशोधनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असताना भारतात या क्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. २०३५ पर्यंत भारताला ‘क्वांटम सक्षम अर्थव्यवस्था’ बनविण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले असून त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आल्याचे सिंघी यांनी यावेळी सांगितले.
अमित सिंघी म्हणाले की, सध्या वापरात असलेली सायबर सुरक्षा व्यवस्था ही गणिती कोडिंगवर आधारित असून ती अत्यंत मजबूत मानली जाते. मात्र, या क्वांटम तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर मोठे आव्हानही उभे राहणार आहे. सध्या इंटरनेट, बँकिंग, डिजिटल व्यवहार यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिप्टोग्राफी प्रणाली भविष्यात क्वांटम संगणकांमुळे मोडीत निघू शकतात. त्यामुळे बँकिंग, डिजिटल पेमेंट, ई-मेल, इंटरनेट प्रोटोकॉल, ब्लॉकचेन आणि शासकीय यंत्रणांतील माहिती सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज डेटा सुरक्षित असला तरी भविष्यात तो उघड होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अमित सिंघी म्हणाले की, जगातील विविध तज्ज्ञांच्या मते, २०३० च्या दशकाच्या सुरुवातीस क्वांटम संगणन इतके सक्षम होण्याची शक्यता आहे की ते पारंपरिक क्रिप्टोग्राफी मोडू शकतील. याच पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी ‘पोस्ट- क्वांटम क्रिप्टोग्राफी’कडे वाटचाल सुरू केली आहे. या संक्रमणासाठी सर्वप्रथम संस्थांनी आपल्या प्रणालीतील क्रिप्टोग्राफीचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे. त्यानंतर जोखीम मूल्यांकन, धोरण आखणी, अंमलबजावणी आणि सातत्याने निरीक्षण या टप्प्यांमधून ‘क्वांटम -सेफ’ प्रणाली विकसित करावी लागेल. यामध्ये शासकीय यंत्रणा, खाजगी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय मानक संस्था यांचे समन्वित प्रयत्न आवश्यक ठरणार आहेत.
क्वांटम सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर जनजागृती, सशक्त प्रशासकीय यंत्रणा, तांत्रिक क्षमता विकास, संशोधन आणि नवोन्मेष यांना प्राधान्य देणे गरजेचे असून भविष्यातील सायबर सुरक्षेचा पाया आजच मजबूत करणे ही काळाची गरज असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
