Marathi e-Batmya

अतुल लोंढे यांचे टीकास्त्र; निवडणूकीत चारीमुंड्या चित झालेल्या नड्डांची मुंबईत पोकळ गर्जना

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे. शिमला महानगरपालिकेतही भाजपाचा पराभव काँग्रेसने केला आहे. त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात भाजपचा एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कर्नाटकातही नड्डांच्या भाजपाचा सुपडासाफ झाला. नड्डा म्हणजे पराभव हे चित्र स्पष्ट असताना काही गद्दारांच्या साथीने मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे दिवास्वप्न जे. पी. नड्डा पहात आहेत, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला देशभरातील जनता कंटाळलेली आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारात भाजपा आकंठ बुडालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनता प्रतिसाद देत नाही तर जे. पी. नड्डांना कोण प्रतिसाद देणार? परंतु राणा भिमदेवी थाटात मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या वल्गना ते करत आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कांदीवलीमधील कार्यक्रमाला १०० माणसेही उपस्थित नव्हती.

जे पी. नड्डांना त्यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशने स्विकारले नाही तर मुंबईची जनता त्यांना कशी साथ देईल. भाजपा व जे. पी. नड्डा यांनी कितीही जोर लावला तरी मुंबई महानगरपालिका जिंकणे त्यांना शक्य नाही. मुंबईकर जनता भाजपाचे राजकारण ओळखून आहे, ते त्यांना थारा देणार नाहीत, असेही लोंढे म्हणाले.

Exit mobile version