देशात कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करण्यात मागे नसलेल्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात सध्या तरी कोणत्याही राजकिय पक्षाकडून धरला जात नाही. मात्र महाराष्ट्रातही कोणत्याही गोष्टीचे इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचा नवा पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही सण-उत्सव असो किंवा जयंती उस्तव असो किंवा दिन असो त्याचे रूपांतर इव्हेंटमध्ये झालेले सर्व नागरिकांना दिसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात दही हंडी सणाच्या तोंडावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सण-उत्सवावरील निर्बंध उठविण्यात आल्याचे जाहिर केले. तसेच दही हंडी सणाच्या दिवशी स्वत: मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे मुंबई, ठाणे येथील शिंदे गट आणि भाजपा आमदारांच्या दही हंडी उत्सवाला जातीने हजेरी लावली. दही हंडी पाठोपाठ गणेशोत्सव आल्यानंतर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार वगळता ठाकरे विरोधक आणि भाजपाचे नेते तथा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी हजेरी लावत गणरायाचे दर्शन घेतले. त्यावरून विरोधकांनी टीकाही करण्यास सुरुवात केली.
आता त्यातच राज्यात शिक्षक दिन उद्या सोमवारी ५ सप्टेंबर रोजी येत असल्याने हा दिनही इव्हेंट पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या दिना निमित्त मुख्यमंत्री शिंदे हे राज्यातील सर्व शिक्षकांशी ऑनलाईन पध्दतीने संवाद साधणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये शिक्षकांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दुपारी १ वाजेपासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोरोना संकटानंतर अलिकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान उहापोह होणे अपेक्षित आहे. या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून जाहिर करण्यात आले आहे.
ज्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इव्हेंट पध्दतीने कार्यक्रम साजरे करत आपली लोकप्रियता वाढविली आणि अबादीत ठेवली. अगदी त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला लोकप्रियता आणि राजकिय प्रतिमा उचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
