Marathi e-Batmya

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत

मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला असा उपरोधिक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. याशिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स‘, ‘खिचडी फाईल्स‘, ‘कोविड बॅग फाईल्स‘ असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा अशी उपरोधिक टीकाही केली.

बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Exit mobile version