Marathi e-Batmya

एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस-‘वंचित’चा रा. स्व. संघाच्या नागपूरच्या मुख्यालयावर मोर्चा

एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम का ठेवले? याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी २३ मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हजारो पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टिन फाईलची जी माहिती जाहीर केली आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री हरदीप पुरी यांचेही अनेकवेळा एपस्टिन फाईलमध्ये नाव आलेले आहे. अमेरिकेशी केलेल्या व्यापारी करारानेही भारतातील शेतकरी व शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भारताने अमेरिकेशी तडजोड केली असून नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व व स्वाभिमान गहाण ठेवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एपस्टिन फाईलच्या निमित्ताने नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे चाल, चलन, चेहरा व चारित्र्य उघड झाले आहे. रा. स्व. संघ ही भाजपाची मातृसंस्था असून भाजपासाठी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय भाग घेत असते. भारताची जगात नाच्चकी होत असताना रा. स्व. संघाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधापदावर अद्याप का ठेवले आहे, या मागणीसाठी हा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

Exit mobile version