मुख्यमंत्री असताना कोकणच्या भल्याचा एकही निर्णय न घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणी माणसावर बेगडी प्रेम असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नुकताच उबाठा नेतृत्वाने पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करण्याचे जाहीर केले. या वक्तव्याचा केसरकर यांनी खरपूस समाचार घेतला. केसरकर म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांसाठी काजू बोर्डाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने समिती नेमली होती. तेव्हा अर्थराज्यमंत्री या नात्याने या समितीचे आपण अध्यक्ष होतो. काजूचे धोरण कोकणचा कायापालट करणारे धोरण होते, मात्र अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही त्या धोऱणाला मंजुरी दिली नाही. यावरुन उद्धव ठाकरेंना दुर्लक्षित कोकणाबद्दल किती आत्मियता होती हे जवळून अनुभवले, असा टोला केसरकर यांनी लगावला.
दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, चांदा ते बांदा योजना अर्थ खात्याने बंद केली होती. ती पुन्हा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश आवश्यक होते, मात्र तेव्हाही उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले. कोकणाच्या विकासासाठी एक शब्द देखील टाकला नाही ही वस्तुस्थिती आहे. कोकणी माणसावर त्यांचे केवळ बेगडी प्रेम आहे, त्याचा केवळ शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी वापर केला जातो, जे चुकीचे आहे, असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, याउलट एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर लगेच काजू बोर्डाला १५०० कोटींचा निधी दिला, काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पहिल्यांदाच आर्थिक मदत केली. काजू बोंडाशी संबधित उद्योगांबाबतचा प्रयोग यशस्वी झाल्यास कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना ३००० कोटींचा फायदा होईल, हे पूर्वी का घडले नाही, असा सवाल उपस्थित करत त्यामुळेच संपूर्ण कोकण किनारपट्टी ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासोबत राहिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून कोकणी जनता मूळ शिवसेनेसोबतच असल्याचे शिक्कामोर्तब झाले असल्याची प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त केली.
शेवटी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कोकणात जे प्रकल्प आले त्याला विरोध करण्यात उबाठा आघाडीवर होती. राजकारण करत त्यांनी विरोधाला विरोध केला. मात्र यातून कोकणी तरुणांचे रोजगार बुडाले. कोकण विकासापासून वंचित राहिला, त्यामुळे कोकणी जनता तुम्हाला कधीच सोबत करणार नाही, असे भाकितही यावेळी केले.
