राज्यात नव्याने स्थानपन्न झालेल्या महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर संध्याकाळी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तसेच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राची राजकिय संस्कृती वेगळी असून राज्यातील राजकिय परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी भूमिका घ्यावी असे वक्तव्य करत मला बदल्यांचे राजकारण नाही तर बदलाचे राजकारण करायचे असल्याची ग्वाहीही दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच केलेल्या घोषणेला ४८ तास उलटून जात नाहीत. तोच त्यांच्याच वक्तव्याचा आणि घोषणेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. तसेच सत्ताधारी विरोधकांमधील संवाद पूर्वी प्रमाणे रहावा म्हणून शिवसेना उबाठाचे नेते तथा आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी हात पुढे केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा आणि अभिनंदन स्विकारण्याची साधी तसदी घेतली नसल्याचे दृष्य आज विधानसभेतील आमदारांच्या शपथविधी दरम्यान दिसून आले.
१५ व्या विधानसभेचे विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. विधानसभा सदस्यत्वासाठी निवडूण आलेल्या सदस्यांचा शपथविधी पार पडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ते आपल्या आसनाकडे जात असताना त्यांना हात मिळवून शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे दोन पावले पुढे गेले पण देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले नसल्याने संवादाची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थांबली असल्याचे दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे नाव आमदारकीच्या शपथविधीसाठी पुकारण्यात आले तेव्हा सभागृहात एकच जल्लोष करीत जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत करीत सभागृह डोक्यावर घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यावर विधानसभा अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांना भेटून त्यांचे आभार मानत त्यांच्या जागेवर जात असता विरोधी आमदारांना नमस्कार करत पुढे जात होते. त्यावेळी पहिल्याच रांगेत बसलेल्या आदित्य ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी स्मित हास्य करीत नमस्कार केला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी तात्काळ उठून उभे रहात फडणवीसांना शेकहॅण्ड करण्यासाठी हात पुढे केला. पण देवेंद्र फडणवीस यांनी साफ दुर्लक्ष करत तसेच पुढे चालत गेले आणि त्यांच्या आसनावर बसले.
देवेंद्र फडणवीस यांच्या कृत्याकडे आदित्य ठाकरे हे दोन तीन मिनिटं पहातच राहिले. त्यावेळी फडणवीसांकडून अवमानित झाल्याची भावना आदित्य ठाकरे यांची झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पुढील दोन तीन मिनिटात विधानसभेच्या सभागृहातून बाहेर पडले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली ते सुद्धा विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करीत आपल्या आसनावर जाऊन बसले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे बघण्याचे सुद्धा टाळले. त्या दोन तीन मिनिटाच्या काळात अजित पवार शपथ घेऊन खाली येत होते आणि आदित्य ठाकरे सभागृहाबाहेर पडत होते. त्याच वेळी आदित्य ठाकरे व अजित पवार समोरासमोर आले. आदित्य ठाकरे यांनी अजित पवारांना हात मिळवत शुभेच्छाही दिल्या.
