Marathi e-Batmya

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या नेत्यांच्या बॅगांची केली तपासणी

मागील दोन दिवसांपासून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार दौऱ्यात बॅगांची तपासणी केली. त्यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगा तपासल्या का असा सवालही यावेळी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या बॅगांची तपासणी केली.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बारामती सरकारी वाहनातून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना रसद पुरविली जात असल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीवर केला. या आरोपाची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेत यासंदर्भात सर्वच वाहनांची तपासणी करण्याचे आदेश राज्यातील प्रशासकिय यंत्रणेला दिले.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरने अमरावतीत गेले असता वणी येथे त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मराठवाड्यातील आणखी एका ठिकाणी त्यांच्या हेलिकॉप्टरसह बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकार आणि निवडणूक आयोगावर शरसंधान साधले.

त्यावरून निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिक जागृत झाले असून आज दिवसभरात देवेंद्र फडणवीस यांची बॅग नागपूर विमानतळावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर डहाणू-पालघर येथे तर नाना पटोले आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे आज राजकिय नेत्यांच्या सभापेक्षा बॅग तपासणीच्या कार्यक्रमाची चर्चाच जास्त रंगली.

दरम्यान बॅग तपासणीवरून आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Exit mobile version