राज्यातील जनतेला दुष्काळाचे भयंकर चटके बसत आहेत, ग्रामीण भागासह शहरातही पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रचंड आहे, शेतकरी संकटात आहे पण सरकार मात्र काहीही करत नाही. दुष्काळ निवारणासाठी भाजपा महायुती सरकारडे कसलेही नियोजन नसून केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत. ठाण्यासह राज्यातील अनेक शहरात पिण्याचे पाणी मिळत नाही. काँग्रेस पक्ष दुष्काळाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे आज प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभाग व सेलच्या अध्यक्षांसोबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिस्ती, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते. आगामी काळात आक्रमकपणे काम करण्याचे तसेच सहा महिन्याचा कृती कार्यक्रम पुढील चार दिवसात सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचे शहर ठाण्यातही पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई आहे, अनेक शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. टँकर लॉबीला पाणी मिळते, या टँकर लॉबीचा फायदा करुन देण्यात सरकारला अधिक रस दिसत असून ‘दुष्काळ आवडे सरकारला’ अशी अवस्था आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे पण ५ हजार रुपयावर शेतकऱ्याची बोळवण केली आहे, भरीव मदत अद्याप मिळालेली नाही. केंद्र सरकारनेही मदतीच्या नावाखाली महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. महायुती सरकारने ३१० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला पण मदत करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोपही यावेळी केला.
भाजपा आमदार महेश बालदीचे सदस्यत्व रद्द करा
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश बालदी यांना अलिबाग न्यायालयाने तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या आमदाराचे सदस्यत्व विधानसभा अध्यक्षांनी तातडीने रद्द केले पाहिजे. काँग्रेस आमदार सुनिल केदार यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांचे विधानसभा सदस्यत्व तातडीने रद्द करण्यात आले. राहुल गांधी यांना एका खोट्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांचे लोकसभा सदस्यत्व २४ तासात रद्द केले, त्यांचे शासकीय निवासस्थानही खाली केले. पण भाजपाच्या आमदारांना शिक्षा होऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही शिक्षा झाली असता त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली नाही. भाजपा सरकार स्वताच्या आमदारांना एक न्याय लावते तर विरोधकांना दुसरा न्याय. विधानसभेचे अध्यक्ष अलिबागमध्ये आदिवासींच्या जमिनी बळावण्यात व्यस्त असल्याने त्यांना बालदींचे सदस्यत्व रद्द करण्यास वेळ मिळत नसावा, असा खोचक टोलाही सपकाळ यांनी लगावला.
NSUI चे सोशल मीडिया अभियान
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तरुणाई व विद्यार्थ्यांच्या आवाजाला व्यासपीठ देण्यासाठी NSUI ने सोशल मीडियावर एका अभियानाची सुरुवात केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे व आकाश रजावत यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रातून सुरु करण्यात आलेले हे अभियान देशभर राबविले जाणार आहे.
