Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ याची स्पष्टोक्ती, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची

देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे. रा. स्व. संघ व भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपवायचे आहे. मागील १२ वर्षापासून संविधान व लोकशाही पायदळी तुडवली जात आहे आणि याविरोधात आपल्याला खंबीरपणे लढायचे आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी सरळ सरळ लढाई असून या लढाईमध्ये अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची आहे, ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढू, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, अनुसुचित जाती विभागाचे माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाला १०० वर्षे झाली तरी अद्याप या संघटनेची नोंदणी केलेली नाही, त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती नाही, आणि जी संघटना समाजात विष कालवते, त्या संघटनेचे गुणगान एक आयपीएस अधिकारी गातो, त्या संघटनेला चांगली संघटना म्हणतो, हे अत्यंत गंभीर आहे. देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन करत हर्षवर्धन सपकाळ यांनी अनिरुद्ध वनकर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना अनिरुद्ध वनकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा दिला होता, तो संविधान संपवण्यासाठी होता. भारतीय जनता पक्ष व रा. स्व. संघाला देशात मनुवाद आणायचा आहे, भाजपा संघाचा हा कुटील डाव लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओळखला आणि हातात संविधान घेऊन लोकसभा निवडणुकीत देशभर रान पेटवले व भाजपाचा डाव हाणून पाडला पण हा धोका संपलेला नाही. देशाचे संविधान धोक्यात आहे हे ओळखून काम करा, एसआयआर मधून दलित, अल्पसंख्याक समाजाची नावे वगळली जात आहेत, त्याकडे लक्ष द्या, असे आवाहनही वनकर यांनी केले.

अनुसुचित जाती विभागाचे माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनाही यावेळी मार्गदर्शन केले.

Exit mobile version