उत्तर भारतीय बिहारी फ्रँटचे नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन मधील एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजेंद्र पाल गौतम, उदित राज, प्रदेश सरचिटणीस राणी अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उत्तर भारतीय समाज मुंबईसह राज्याच्या प्रत्येक भागात रहात असून महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचेही योगदान आहे. हा समाज काँग्रेस पक्षासोबत नेहमी खंबीरपणे उभा राहिला व काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांना मुंबई व महाराष्ट्रात विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. राहुल गांधी यांच्या रुपाने काँग्रेस पक्षाला एक कणखर नेतृत्व लाभले असून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. काँग्रेस संघटना मजबूत करून देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही यावेळी केले.
वंदे मातरम वरून राजकारण करण्याचा भाजपाचा प्रयत्न..
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वंदे मातरम राष्ट्रगितावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे. वंदे मातरम हे १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात पहिल्यांदा गायले गेले व तर २४ जानेवारी १९५० रोजी ते देशाचे राष्ट्रीयगीत म्हणून स्वीकारण्यात आले. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या उपस्थितीत याचा निर्णय झालेला असून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात व कार्यक्रमात ते गायिले जाते. भारतीय जनता पक्षाकडून एक व्हिडिओ प्रसारित करून काँग्रेसविरोधात अपप्रचार केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना जास्त वेळ उभा राहता येत नाही ये लक्षात घेऊन सोनियाजी गांधी काही सुचना करत आहेत परंतु भाजपा कडून मात्र वंदे मातरमचा अपमान केल्याचा अपप्रचार केला जात आहे, हा अपप्रचार थांबवावा.वंदे मातरम बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवण्याची गरज नाही, असेही म्हणाले.
उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजेंद्र पाल गौतम यावेळी म्हणाले की, देशात पूर्वी सर्वसामान्य लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत मतदानाचा हक्क सर्वांना देण्याचा मुद्दा मांडला व १९३५ साली कायदा बनला, त्यानुसार सर्वसामान्य समाजातील घटकांना तसेच महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळाला आणि १९३७ साली झालेल्या निवडणुकीत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्यांना आपल्या पूर्वजांचा इतिहास माहित नाही ते इतिहास घडवू शकत नाहीत म्हणून स्वातंत्र्याची लढाई कोणाच्या नेतृत्वाखाली लढली हे माहित असले पाहिजे. काही लोकांना वाटते स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले त्यांना हे माहित हवे की स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढली गेली, या लढाईत हजारो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, जेलमध्ये गेले, लाठ्या काठ्या अंगावर घेतल्या. देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारत गरिब देश होता पण काँग्रेसच्या सरकारांनी विकासाची एक एक शिखरे उभी केली पण आजचे सरकार ते सर्व विकत आहे. आज जे लोक सत्तेत आहेत त्यांनी समाजात जाती धर्माच्या नावावर विष पेरले आहे. समाजात विष पेरणाऱ्यांना आता सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
यावेळी उदित राज म्हणाले की, मुंबईसह महाराष्ट्रात उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेसने नेतृत्व करण्याची संधी दिली, मंत्री, आमदार व खासदार बनवले. काँग्रेसला तुमची व तुम्हाला काँग्रेसची गरज आहे. देशात धर्मनिरपेक्ष पक्ष हा फक्त काँग्रेस पक्ष आहे आणि सरकारला जाब विचारणारा नेता फक्त राहुल गांधी हे आहेत. आता भाजापच्या सत्तेचे काऊंटडाऊंन सुरु झाले असून काँग्रेसचे सरकार लवकरच देशात येणार आहे, असा विश्वास उदित राज यांनी व्यक्त केला.
