Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, निवडणुकीत भाजपाच्या पोस्टर्स, बॅनर्सवर टिपू सुलतानचा फोटो कसा चालतो?

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, आन, बान, शान आहेत, त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे. भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही. एपस्टिन फाईल्समध्ये भाजपाच्या नेत्यांची नावे आली आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार कराराचा मुद्दा आहे आणि राज्यातही ज्वलंत मुद्दे आहेत, या मुळ मुद्यांना बगल देण्यासाठी भाजपाकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून “ध” चा “मा” करून राज्यात दंगली घडवायच्या आहेत, याचा प्रत्यय आज पुण्यात आला, असे सणसणीत प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले आहे.

टिपू सुलतानच्या मुद्द्यावर वर्धा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे, समाजात द्वेष पसरवला जात आहे, या पार्श्वभूमीवर सर्व महामानवांचे फोटो कार्यालयात सोबत लावावेत का ? आणि विशेष छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचे फोटो आजूबाजूला असावेत का या मागणीकडे आपण कसे बघता ?” असा प्रश्न पत्रकारांनी मला विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मी वक्तव्य केले होते – पण “ध” चा “मा” करण्याची देवेंद्र फडणवीसांची जुनी खोड जागी झाली आणि त्यांनी माझ्या विधानातून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याची संधी शोधली. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली, त्यांना गजनी म्हटले, त्यावेळी ते म्हणाले होते, कोण हर्षवर्धन सपकाळ, मी त्यांना ओळखत नाही. पण काल मात्र त्यांना माझ्या नावाने तावातावात बोलत गरळ ओकली. प्रत्येक बाबतीत जात व धर्म आणणे हा भाजपाचा जुना फंडा आहे. भाजपा माझ्या वक्तव्याला हिंदू मुस्लीम रंग देऊन खतपाणी घालत आहे. पुण्यातील भाजपाचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपच्या या गुंडगिरीचा आम्हा तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगेखोर भाजपा गुंडाना चिथावणी देणा-या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपाच्या दंगेखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मला माफी मागायला लावण्याची भाषा माफीवीरांचा पक्ष करत आहे. परंतु टिपू सुलतानच्या मुद्द्यावर बोलताना भाजपा व देवेंद्र फडणवीस हे विसरत आहेत की, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या बॅनर्स व पोस्टर्सवर टिपू सुलतानचे फोटो होते. भाजपाने राज्यात अमरावती चंद्रपूरसह २१ ठिकाणी धर्मांध एमआयएमशी युती केली आहे, हे भाजपाला चालते, मग आताच काय झालं. भाजपा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा आणणार व १७ तारखेला माझे पुतळे जाळणार आहे, अशी माहिती मिळत आहे. मग सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याला ‘काततीय योग’ (कावळा बसायला आणि फांदी तुटायला….) असे म्हटले आहे. सावरकरांनी महाराजांबद्दल जे विकृत लिखाण केले आहे तसेच भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, त्याबद्दल भाजपा सावरकर व कोश्यारी यांचे पुतळे जाळणार का? असा सवालही यावेळी केला.

Exit mobile version