Marathi e-Batmya

जयंत पाटील यांची टीका ,५०० कोटींच्या वर टर्नओव्हर असणाऱ्यांच्या बोकांडी चार स्वीकृत सदस्य नेमण्याचा दुर्दैवी कायदा

आजपर्यंत लोकशाहीचा आदर करून भारतामध्ये व्यवहार सुरू होता. त्याच तत्त्वावर देशातील सहकारी संस्था सुरू होत्या. तज्ञ स्वीकृताला सल्ला देण्याच्या अधिकारापर्यंत सीमित करण्यात आले होते. दोनपेक्षा जास्त तज्ञ स्वीकृत नसावे असा आपला शिरस्ता आहे. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात एक वेगळा पायंडा पाडला जातोय. गोकुळमध्ये सतेज पाटील यांची मेजॉरिटी मोडून काढण्यासाठी चार तज्ञ नेमण्याचा आणि त्यांना मतांचा अधिकार देण्याचे पाप सध्याच्या सरकारने करायला लावले आहेत अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.

गोकुळ वाचविण्यासाठी कोल्हापूर येथील दसरा चौकात काढण्यात आलेल्या संघर्ष मोर्चातील लाखोंच्या संख्येने उपस्थित असणार्‍या जनसमुदायाला त्यांनी संबोधित केले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारने लोकशाहीची मूल्ये धाब्यावर बसवून अनेक निर्णय घेतले. देशातील सर्व व्यवस्था ताब्यात घेऊन सत्तारूढ लोकं बसली आहेत. न्यायालयाचा निकालही आम्ही लावू शकतो अशी वल्गना करणाऱ्यांची गर्दी पलीकडे आहे. शिवसेना पक्षाचे पक्ष चिन्ह हिरावून घेण्यात आले. अद्यापही निकाल लागलेला नाही. पण देशात सुरू असलेली परिस्थिती उघड्या डोळ्याने जनता बघत आहे. वकिलांचाही व्यवस्थेवरील आत्मविश्वास कमी झालेला आहे. या देशात न्याय आहे का? न्याय मिळाला नाही तर लोकं रस्त्यावर उतरतील याची सत्तारूढ पक्षाने नोंद घ्यावी असा इशाराही यावेळी दिला.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, अन्याय करण्यावरही मर्यादा असली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना जर लोकशाहीची बूज राखायची असती तर त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आग्रहाला ते बळी पडले नसते. ५०० कोटींच्या वर टर्नओव्हर असणाऱ्यांच्या बोकांडी चार स्वीकृत सदस्य नेमण्याचा दुर्दैवी कायदा केला आहे. गोकुळपुरता हा निर्णय नाही. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेकरीता हा निर्णय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचे कौतुक करताना ते म्हणाले की, कोल्हापूरकरांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. एकटे सतेज पाटील लढत होते, त्यांच्या बाजूने या कोल्हापूर जिल्ह्याने कौल दिला. लढणाऱ्यांच्या मागे कोल्हापूर जिल्हा उभा राहिलेला आहे हा कोल्हापूरचा इतिहास आहे. तो तुम्ही पुन्हा सिद्ध केला. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्या की कसा बदल होतो हे सतेज पाटील आणि हर्षदा देशमुख यांनी दाखवून दिले. ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या हा आता लोकांचा आग्रह आहे असंही ते म्हणाले.

माझं सरकारला म्हणणं आहे ही टेस्ट ट्युब बेबी मागे घ्या

पुढे जाऊन जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट करत म्हणाले की, बारा जणं मीटिंगला बसले की ते त्यांचे राहणार नाहीत ही शंका असल्याने त्यांना पाठविले नाहीत. ते एकदा समोर आले की सतेज पाटील यांच्या सीट १५-१६ झाल्याशिवाय राहणार नाही. तिथे सगळं आलबेल आहे हे खासगीत लोकं माझ्याशी बोलतात. टेस्ट ट्युब बेबीचा कधी वापर होतो? होत नसेल तर टेस्ट ट्युब बेबी. माझं सरकारला म्हणणं आहे ही टेस्ट ट्युब बेबी मागे घ्या. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळचा जो विकास होईल तो सरकारने स्वीकारला पाहिजे, लोकशाहीची हीच पद्धत आहे. आपण लोकशाहीत राहतो रेटारेटी करू नका, त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील असा इशाराही दिला.

Exit mobile version