Marathi e-Batmya

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, प्राण जाए पर….उक्ती प्रमाणे आश्वासने पूर्ण करा

भारतीय जनता पक्षाच्या २०१४ सालच्या जाहीरनाम्यात ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हे वाक्य होतं. परंतु महाराष्ट्रावर तेव्हा ३ लाख कोटी रूपयांचं कर्ज होतं आणि आता आपण ९ लाख कोटींपर्यंत पोचलो आहे, याबद्दल जयंतरावांनी खेद व्यक्त केला. एमआयडीसीची ताकद वाढवली जाईल, असं आश्वासन देखील त्यात दिलं गेलं होतं. पण राज्यातल्या कंपन्या बाहेर जात आहेत, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. तसेच महाराष्ट्रात मोठा प्रकल्प यावा, अशी जनतेची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच भारतीय जनता पक्षाने मागील दहा वर्षांमध्ये दिलेल्या सर्व आश्वसनांची आठवण जयंतरावांनी सरकारला करून दिली. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ या उक्तीप्रमाणे ही सर्व आश्वासने पूर्ण करावीत, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मुंबई- गोवा महामार्गचे काम मागील १० वर्षांत पूर्ण झाले नाही ते लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे. महाराष्ट्रात मुदत संपली असतानाही टोल नाके सुरु आहेत, याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याची संधी सरकारकडे आहे, त्यांनी तो करून दाखवावा असे आव्हानही यावेळी सत्ताधाऱ्यांना दिले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मराठी शाळा बंद होत आहेत याकडे शासनाने लक्ष द्यावे. महिला अत्याचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि महिला बेपत्ता घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी सूचना करत ‘लाडकी बहिण योजने’मध्ये वय वर्ष ६५ च्या वरील महिलांचाही समावेश करून घ्यावा, अशी मागणी सरकारकडे केली. तसेच एकाही लाडक्या बहिणीचं नाव कमी न करता सरकार आपले आश्वासन पूर्ण करू शकतो, असा उपरोधिक टीका केली.

यावेळी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता, या घटनेवर प्रकाश टाकला. या घटनेला अनेक महिने उलटून गेलेत. तरी सरकारने त्यातील दोषींवर काय कारवाई केली? याची माहिती समोर यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. विरोधक म्हणून आम्ही ईव्हीएम EVM बद्दल शंका उपस्थित केली. निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यायला हवी. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज काय? असा टोलाही मुख्यमंत्र्यांना लगावला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यासाठी सरकारने कायमस्वरूपी काही उपाययोजना कराव्यात. अशी सूचना करताना पीक विम्याच्या प्रश्नांमध्ये शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत? हे सरकारने जाणून घेतले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली. तसेच सरकारने ऊस आणि साखर उत्पादकांना न्याय देण्यासाठी बहुमताच्या जोरावर उत्तम काम करावे, अशी विनंतीही पाटील यांनी केली.

जयंत पाटील शेवटी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या घटनेवर उत्तर देताना सोमनाथ सूर्यवंशीला दम्याचा त्रास होता असे सांगितले. परंतु मुख्यमंत्र्यांचे उत्तर आणि शवविच्छेदन अहवालामध्ये अंतर असल्याचे जयंतरावांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले. तसेच त्याची चौकशी करून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळायला हवा. म्हणून या घटनेत कुणीही दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा धाडस मुख्यमंत्री करतील, असा विश्वास जयंतरावांनी व्यक्त केला. राज्यात पुन्हा अशा घटना होणार नाहीत, याची आपण सर्वजण मिळून काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना माननीय आमदार जयंतराव पाटील यांनी सभागृहाला केली.

Exit mobile version