नुकताच एनसीआरबीचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालातील आकडेवारी महाराष्ट्रासाठी काही अनुकूल नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे. देशात १७ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे पण महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या मध्ये पहिला तर महिला अत्याचार मध्ये देशात दुसरा! अरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा सवालही केला.
जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरून ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात वर्षभरात ३८२४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात वर्षभरात महिला अत्याचारांच्या ४७९५४ घटना घडल्या असून महिला अत्याचारांमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. ज्या भ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी पीएचडी केली आहे. त्या भ्रष्टाचारात ७२१ प्रकरणांसह आपण पहिल्या स्थानावर आहोत अशी आकडेवारी देत त्यांनी सरकारची पोलखोल केली आहे.
सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा, पवित्र देशा ही महाराष्ट्राची ओळख साफ पुसून टाकली आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून विधिमंडळात वारंवार शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, भ्रष्टाचार याबद्दल सरकारचे लक्ष वेधले, पण सरकारकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सरकारला काहीही सांगा सरकारचं एकच उत्तर असतं All Is Well! असे ते म्हणाले.
