Marathi e-Batmya

मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रुपयांची मदत

महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात शेतकरी आणि ग्रामीण नागरिक भीषण पाणीटंचाई व पिकांच्या नुकसानीमुळे कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. या संकटसमयी समाजाप्रती आपली बांधिलकी जपत मंत्री अतुल सावे यांनी आपल्या चिरंजीवाचा भव्य विवाहसोहळा रद्द करून अत्यंत साधेपणाने विवाह करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर या सोहळ्यासाठी होणारा खर्च वाचवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

येत्या २५ नोव्हेंबर रोजी अनुराग आणि ईशा यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परिसरातील बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना भव्य उत्सव साजरा करणे योग्य नाही, अशी भूमिका वधू-वर पित्याने घेतली.

“सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही केवळ जबाबदारी नसून आपले कर्तव्य आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक वातावरणात साध्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचे सर्वस्तरातून अत्यंत कौतुक होत असून, “आमच्या या छोट्याशा मदतीमुळे संकटग्रस्त शेतकरी बांधवांना आणि गरजू कुटुंबांना थोडा दिलासा मिळावा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version