महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आज विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहिर करण्यात आली. २२ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहिर केली.
ही उमेदवारांची यादी जाहिर करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर टीका करताना म्हणाले की, भाजपाची राज्यातील लाडक्या बहिणीबद्दल असलेली भावना या निमित्ताने बाहेर आली. लोकसभा निवडणूकीत पुरेशा जागा जिंकता आल्या नाहीत म्हणून हे बहिणींवरील प्रेम दाखविण्याचा प्रयत्न भाजपाने सुरु केला. परंतु भाजपाचे लाडक्या बहिणींबद्दल असलेले खोटे प्रेम या निमित्ताने यावेळी बाहेर आले. त्यामुळे या भाजपाच्या खोट्या बहिणीबद्दलच्या प्रेमाला राज्यातील लाडक्या बहिणी योग्य तो धडा शिकवतील अशी टीका केली.
भाजपाचे डॉ सुजय विखे-पाटील यांच्या संकल्प युवा मेळाव्यात भाजपाचे पदाधिकारी वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ जयश्री थोरात यांच्या कन्येवर अश्वाघ्य भाषेत टीका केली. त्यावरूनही जयंत पाटील यांनी टीका केली.
त्याचबरोबर जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात सरासरी दिवसाला २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मराठवाड्यात मागील काही दिवसात २०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या निवडणूकीच्या कव्हरेजमध्ये सर्वच जण असल्याने या बातम्या बाहेर आल्या नाहीत. मात्र ही आकडेवारी सरकारीच असल्याचे सांगत राज्यातील शेतकरी महायुतीच्या सरकारला नक्कीच जाब विचारेल अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भूम-परांडा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे गेला. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल मोटे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यामुळे या मतदारसंघातून राज्याचे आरोग्य मंत्री तथा शिवसेना फुटीत महत्वाची भूमिका बजावणारे डॉ तानाजी सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे हे आता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र शिवसेना उबाठा पक्षाने भूम-परांडा मतदारसंघातून डॉ तानाजी सावंत यांच्या विरोधात राहुल पाटील यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे महाविकास आघाडीत भूम-परांडा च्या विधानसभा मतदारसंघावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या जागे संदर्भात आम्ही शिवसेना उबाठा गटासंदर्भात चर्चा करू आणि मार्ग काढू. आता जागा एक्सचेंज आणि अशा गोष्टी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी त्या फोनवरून देवाण-घेवाण करून सोडवू असे सांगत या जागेवरील वाद मार्ग काढून संपवू असेही यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी दुसऱ्या
१. ११६ एरंडोल- सतीश अण्णा पाटील
२. १११ गंगापूर- सतीश चव्हाण
३. १३५ शहापूर- पांडुरंग बरोरा
४. २४३- परांडा राहुल मोटे
५. २३० बीड- संदीप क्षीरसागर
६. ४४ आर्वी- मयुरा काळे
७. ११६ बागलान- दीपिका चव्हाण
८. ११९ येवला माणिकराव शिंदे
९. १२० सिन्नर- उदय सांगळे
१०. १२२ दिंडोरी- सुनीता चारोस्कर
११. १२३ नाशिक- पूर्व गणेश गीते
१२. १४१ उल्हासनगर- ओमी कलानी
१३. १९५ जुन्नर- सत्यशील शेरकर
१४. २०६ पिंपरी- सुलक्षणा शीलवंत
१५. २११ खडकवासला- सचिन दोडके
१६. २१२ पर्वती- अश्विनी कदम
१७. २१६ अकोले- अमित भांगरे
१८. २२५ अहिल्या नगर शहर- अभिषेक कळमकर
१९. २५४ माळशिरस- उत्तमराव जानकर
२०. २५५ फलटण- दीपक चव्हाण
२१. २७१ चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
२२. २७९ इचलकरंजी – मदन कारंडे
