एकामागून एक पेपरफुटीच्या घटना राज्यात होत असताना २८ जूनला होणाऱ्या टीईटीच्या परीक्षेला पेपर २७ जूनलाच फुटल्याने त्या परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षक होऊ पाहणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न भंगले असल्या कारणाने विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला ठेऊन स्थगन प्रस्ताव मांडत सर्व कामकाज बाजूला सारत याप्रश्नी चर्चा करावी अशी मागणी विधानसभेत शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव आणि काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केली, तर विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. विधान परिषदेत मात्र सभापती राम शिंदे यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
तर विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा विरोधकांनी मांडलेला प्रस्ताव योग्य नसल्याचे कारण पुढे करत विरोधकांचा प्रस्ताव फेटाळून लावत या प्रश्नी शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन करण्याचे आदेश दिले.
दरम्यान विधान परिषदेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत शासन करत असलेल्या कारवाईची सभागृहात माहिती दिली. मात्र विरोधकांनी सभापतींच्या कृतीचा निषेध करत आपली मागणी कायम ठेवण्यासाठी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापती राम शिंदे यांनी अखेर सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करत असल्याचे जाहीर केले.
महाराष्ट्र टीईटी परीक्षा २८ जून २०२६ रोजी विविध परीक्षा केंद्रांवर होणार होती. मात्र, परीक्षेच्या केवळ एक दिवस आधी महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी झाल्याचे वृत्त आले. परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधी ठाण्यात पेपरफुटी झाली. या पेपरफुटीनंतर शिक्षण विभागाने शिक्षक पात्रता परीक्षा रद्द केली. महाराष्ट्र टीईटी पेपरफुटीची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. ठाण्यात एका कारवाईनंतर पोलिसांनी पेपर जप्त केला. या प्रकरणी अनेक व्यक्तींना ताब्यातही घेण्यात आले. नीटच्या पेपरफुटीनंतर अनेकांवर कारवाई होऊनही महाराष्ट्र टीईटी पेपर फुटीचे गंभीर प्रकरण घडल्याने विरोधकांनी २८९ अंतर्गत चर्चेची मागणी केली होती.
शिक्षण मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही
ज्येष्ठ सदस्य अंबादास दानवे म्हणाले की, भिवंडीसारख्या ठिकाणी टीईटीचा पेपर फुटला. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या बाबी समोर आल्या. यात खरे तर पोलिसांचे अभिनंदन केले पाहिजे. राज्यात शिक्षण व्यवस्था वा परीक्षापद्धती सडलेली आहे. उत्तम शिक्षक निवडण्याची ही परीक्षा पहिली पायरी आहे. पण त्याच वेळी शिक्षक होणाऱ्यांचे स्पप्न भंग पावले. पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परीक्षांचे पेपर फोडण्याचे हे मोठे रॅकेट आहे. शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा होते आणि याला शिक्षणमंत्री पूर्णतः जबाबदार असून त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केला. सहा लाख विद्यार्थ्यांची हे सरकार परीक्षा घेऊ शकत नसेल तर महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचे हे सरकार कसे भले करणार, असा सवाल केला. यातील आरोपी कुठे पळून गेले, शिक्षण खात्यातील यात कोण कोण जबाबदार आहेत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.
तर विधानसभेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले की, यापूर्वी विद्यार्थ्यांच्या नीट परिक्षेचा पेपर फुटला म्हणून केंद्र सरकारचा विषय असतानाही विधानसभेत निवेदन करायला लावले. मात्र टीईटीची परिक्षा ही पुर्णतः राज्याचा विषय असताना त्यावर साधी विधानसभेत चर्चाही होत नाही आणि त्यावर फक्त निवेदन करण्याबाबत विचार केला जात असले तर ते चुकीचे असल्याचे सांगत सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावातंर्गत सविस्तर चर्चा करावी अशी मागणी केली.
प्रकरणाच्या मुळाशी असणाऱ्यांची चौकशी करा
काँग्रेसचे सतेज पाटील म्हणाले की, एखादी परीक्षा घेणे सर्वोच्च न्यायालय बंधनकारक करते तेव्हा ती परीक्षा व्यवस्थित घेणे ही राज्यशासनाची जबाबदारी आहे. तेरा कोटी जनतेचे भले करण्याच्या आणाभाका घेणारो हे सरकार सहा लाख विद्यार्थ्यांची साधी परीक्षा घेऊ शकत असेल तर त्याला काय म्हणावे? पुणे महापालिकेत पेपर फुटला. त्यामुळे आज आंदोलन सुरू झाले. विद्यापीठातही पेपर फुटला. नीटपासून सीबीएसपर्यंत पेपर फोडण्यात कोणाचे लागेबांधे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. भिवंडीत फुटलेल्या पेपरचे सूत्रधार कोण, त्यात कोणाचे लागेबांधे आहेत याची चौकशी झाली पाहिजे. उत्तर प्रदेशपासून देशापर्यंत याचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. राज्यात परीक्षेसंबंधी विश्वासार्हता निर्माण करायची असेल तर समोर दिसणाऱ्या दोन-चार लोकांवर कारवाई करून भागणार नाही, तर या प्रकरणाच्या मुळाशी कोण कोण आहे याचीही चौकशी झाी पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
शिक्षण विभागात मुंडे यांना आणा
अभिजीत वंजारी यांनी मागणी केली की, १,०२८ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. त्या केंन्द्रांवर पेपर कसे चाणार होते, कोणत्या मार्गाने जाणार होते. याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. पेपर फुटणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे तुकाराम मुंडेंसारखा आयुक्त या विभागावर आणला पाहिजे. याप्रकणी चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. तरच असेप्रकार थांबतील, अशी मागणी अभिजीत वंजारी यांनी केली.
अभ्यंकरांनी पुरावेच दिले
ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी या प्रकरणात शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवले त्यांनी या प्रकरणात झालेल्या देवघेवीच्या व्यवहाराचे धनादेश क्रमांक, कोड नंबर आणि नावेही सांगितली. सुधाकर आडबाले, धीरज लिंगाडे, संजय घोडके यांनीही या सभागृहात याबाबत प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, टीईटीचे पेपर फुटले ही बाब गंभीर आहे. पोलीस प्रशासनाने हा प्रकार उघडकीस आणला. त्याबाबत आपण विस्तृत विवरण करणार आहोत. याची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. चारपेक्षा जास्त पथकांद्वारे या प्रकरणाची तपासणी करण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास कायद्यात बदल करण्याची शासनाची तयारी आहे. मात्र या प्रकरणात गुंतले असणाऱ्यांवर चौकशीअंती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या काळात पारदर्शक परीक्षा कशा होतील यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. मात्र शिक्षण मंत्र्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी याबाबत चर्चा करण्याची मागणी लावून धरली. मात्र सभापतींनी त्यांची मागणी मान्य न केल्याने त्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली. अखेर सभापतींनी अर्ध्या तासासाठी सभागृह तहकूब केले.
