Marathi e-Batmya

राहुल गांधी यांचा खोचक सवाल, मोदीजी ५ कोटी कुणाच्या सेफमधून निघाले?

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महामंत्री अर्थात महासचिव विनोद तावडे यांच्याकडून नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात येत असल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

त्यातच पाच कोटी वाटपाचे प्रकरणाची कुणकुण लागताच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर हे ही विवांता हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्या जवळील एक पैशाची काळी पिशवी दाखवित त्यांच्यासोबत असलेल्या एक डायरीही यावेळी प्रसारमाध्यमांना दाखविली.

तसेच बहुजन आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे हे पाच कोटी रूपये घेऊन विरार मध्ये येत असल्याची माहिती भाजपावाल्यांनीच दिल्याचा आरोप केला. त्यानुसार घटनास्थळी पोहोचल्यानंतर विनोद तावडे हे पैशाचे वाटप करत असल्याचे दिसून आल्याचेही यावेळी सांगितले.

विनोद तावडे यांच्या पाच कोटी वाटपाच्या प्रकरणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा या विरोधी पक्षांकडून एकच टीकेचा भडीमार सुरु झालेला आहे. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनोद तावडे यांच्या प्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत थेट खोचक सवाल केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक एक्सवर पोस्ट केली असून या पोस्टमधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है घोषणेच्या अनुषंगाने हे पाच कोटी कुणाच्या सेफमधून (अर्थात तिजोरीतून) निघाले आहेत ? असा सवाल करत जनतेचा पैसा लुटून कोणी टेम्पो पाठविला होता असा खोचक सवालही यावेळी केला.

राहुल गांधी यांनी सोबत विनोद तावडे यांचा विवांता हॉटेलमधील एक व्हिडीओही शेअर केला आहे.

Exit mobile version